Sindhudurg- मिठबांवच्या तरुणाचा खून: अवघ्या १२ तासात पोलिसांनी लावला छडा, संशयित ताब्यात
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: September 19, 2023 03:31 PM2023-09-19T15:31:02+5:302023-09-19T15:36:03+5:30
देवगड : मिठबांव येथे राहणारा प्रसाद परशुराम लोके (३१) याचा मुणगे मसवी रस्त्यावर काल, सोमवारी (दि.१८) पहाटे रक्ताच्या थारोळयात ...
देवगड : मिठबांव येथे राहणारा प्रसाद परशुराम लोके (३१) याचा मुणगे मसवी रस्त्यावर काल, सोमवारी (दि.१८) पहाटे रक्ताच्या थारोळयात मृतदेह आढळला होता. यावेळी त्याच्या गाडीची तोडफोड केल्याचे दिसून आले होते. घटनेची माहिती प्राप्त होताच देवगड पोलिस ठाणे, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा संपुर्ण अभ्यास करण्यात आला. फॉरेन्सीक टीम व डॉगस्कॉड यांना पाचारण करून आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी प्रसाद याच्या मोबाईल लोकेशन वरून अवघ्या बारा तासांत या प्रकरणाचा छडा लावून मालवण कुंभारमाठ येथील संशयितास ताब्यात घेतले. संशयिताने गुन्हा कबूल केला आहे.
मृत प्रसाद याने मिठबांव ते मुणगे मसवी या रत्याने प्रवास केलेला प्रथम दर्शनी निदर्शनास आल्याने या मार्गावरील शासकीय तसेच खाजगी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. परंतु त्यामध्ये कोणतेही संशयास्पद वाहन मृताच्या वाहनाचे पुढे किंवा पाठीमागे येता दिसले नाही. मृताचा मोबाईल घटनास्थळावर मिळून आलेला नव्हता. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सायबर पोलिस ठाण्याच्या मदतीने लोके याच्या मोबाईल ट्रक करण्यात आला.
कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने किशोर परशुराम पवार, (रा. कुंभारमाठ, ता. मालवण) याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्याचा गुन्हयातील सहभाग स्पष्ट झाल्याने देवगड पोलीस ठाण्याने त्यास अटक केली. गुन्हयाचा पुढील तपास देवगड पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे हे करीत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलिस अधिकारी के. एल. सावंत यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र घाग, पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, सहा. पोलिस उप निरीक्षक गुरुनाथ कोयंडे, पोलिस हेडकॉन्स्टेबल राजु जामसंडेकर, आशिष गंगावणे, प्रमोद काळसेकर, किरण देसाई, पोलिस नाईक आशिष जामदार, पोलिस कॉन्स्टेबल यश आरमारकर तसेच सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर, पोलिस कॉन्स्टेबल प्रथमेश गावडे व ओ. टी. बी. पथकाचे पोलिस कॉन्स्टेबल रवि इंगळे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.