बडतर्फ कर्मचाऱ्याने घातला धुमाकूळ, पोलिसांनी घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 04:43 PM2019-05-06T16:43:46+5:302019-05-06T16:46:04+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी विभागातील बडतर्फ विस्तार अधिकाऱ्याने शनिवारी दुपारी कृषी विभागात धुमाकूळ घातला. त्याने कृषी विभागातील टेबल, काचा आणि संगणकाला लक्ष्य करीत त्यांची तोडफोड केली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तोडफोड करणाऱ्याला ताब्यात घेतले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत कृषी विभागाचा एकही कर्मचारी तक्रार देण्यास पुढे आला नसल्याने याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी विभागातील बडतर्फ विस्तार अधिकाऱ्याने शनिवारी दुपारी कृषी विभागात धुमाकूळ घातला. त्याने कृषी विभागातील टेबल, काचा आणि संगणकाला लक्ष्य करीत त्यांची तोडफोड केली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तोडफोड करणाऱ्याला ताब्यात घेतले. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत कृषी विभागाचा एकही कर्मचारी तक्रार देण्यास पुढे आला नसल्याने याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या तळमजल्यातील कृषी विभागातील सेवेतून कमी करण्यात आलेल्या एका कर्मचाऱ्यांने शनिवारी दुपारी कृषी विभागात येत काही माहिती मागितली होती. मात्र ती माहिती देण्यात येत नसल्याने संबंधित कर्मचाऱ्याचा पारा चढला. त्याने हातातील लोखंडी रॉड व फरशीने विभागातील टेबल, खुर्च्या, काचा तसेच संगणक तोडण्यास सुरुवात केली.
संबंधित कर्मचारी हातातील रॉडने मिळेल त्या ठिकाणी वार करीत असल्याने या विभागातील महिला कर्मचारी घाबरून गेल्या होत्या. तसेच बघ्यांची संख्याही मोठी होती. मात्र, त्या कर्मचाऱ्याला अटकाव करण्यास कोणी पुढे जात नव्हते. अखेर या घटनेची माहिती ओरोस पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच ओरोस पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तोडफोड करणाऱ्या त्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. तसेच घटनेचा पंचनामा केला.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कृषी विभागातील बडतर्फ विस्तार अधिकाऱ्याने अवजारे खरेदीत भ्रष्टाचार केला होता. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्याला २००९ मध्ये निलंबित करण्यात आले होते.
दरम्यान संबंधित कर्मचाऱ्याची खातेनिहाय चौकशी सुरू झाली होती. २०१२ मध्ये त्या कर्मचाऱ्यांला पुन:पदस्थापना देण्यात आली होती. संबंधित कर्मचारी चौकशीत दोषी आढळल्याने त्याला २०१३ मध्ये सेवेतून बडतर्फ केले होते. मात्र, हा कर्मचारी आवश्यक कागदपत्रांसाठी कृषी विभागात आला. परंतु२ आवश्यक माहिती विभागातील कर्मचारी देत नसल्याने हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे.