‘पोलिसमित्र’द्वारे चोऱ्यांना पायबंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2016 09:28 PM2016-06-28T21:28:34+5:302016-06-28T21:29:55+5:30

प्रवीण चिंचाळकर : व्यापारी व सुवर्णकारांची सावंतवाडीत बैठक

'Policeman' to the thieves run! | ‘पोलिसमित्र’द्वारे चोऱ्यांना पायबंद!

‘पोलिसमित्र’द्वारे चोऱ्यांना पायबंद!

Next

सावंतवाडी : पावसाळी हंगामात शहरात होणाऱ्या चोऱ्यांमुळे पोलिसमित्र संकल्पना राबवून शहरात घडणाऱ्या चोऱ्यांना पायबंद घालण्याचा प्रयोग यशस्वी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता गस्त घालण्यासाठी पोलिसमित्रांकरिता पुढे यावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण चिंचाळकर यांनी केले आहे.
सावंतवाडी व्यापारी व सुवर्णकार संघटना यांच्यावतीने येथील दैवज्ञ गणपती मंदिरात शहरात घडणाऱ्या चोऱ्यांसंदर्भात उपाययोजना व सूचनांविषयी बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी मार्गदर्शनपर बैठकीत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर पोलिस निरीक्षक शंकर पाटील, व्यापारी संघाचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर, सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद चोडणकर, आनंद नेवगी, संजू शिरोडकर, आदी उपस्थित होते.
यावेळी निरीक्षक पाटील म्हणाले, शहरात परप्रांतीय वस्तू विक्री, मजुरीसाठी येतात. अशा लोकांकडून चोरीसारख्या घटना घडतात. त्यामुळे पोलिस आता अशा लोकांची माहिती घेऊन त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहणार आहेत. सोसायटीधारक, घर, बंगला यामधील रहिवासी आपले घर बंद करून बाहेरगावी काही दिवसांसाठी जात असेल, तर त्यांच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांना त्याची माहिती द्यावी. प्रत्येक सोसायटीच्या जिन्यावर पोलिस विभागातर्फे चोरी टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत माहितीपत्रके लावून जनजागृती केली जाणार आहे.
प्रत्येक घर, दुकानमालकांनी आपल्या घराच्या दरवाजाचे कुलूप भक्कम व मजबूत बसविण्याची काळजी घ्यावी. बँका, पतसंस्था, दुकानदारांनी शक्यतो सीसीटीव्ही कॅमेरे लावून सुरक्षारक्षक ठेवावा. याशिवाय पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवेळी पोलिंसमित्र म्हणून रात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत सहभाग घेतल्यास बऱ्याचअंशी चोऱ्यांना पायबंद
बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी जगदीश मांजरेकर, राजू मसूरकर, संतोष चोडणकर, वल्लभ नेवगी, संजू शिरोडकर, सुमंगल कालेलकर, राजू पनवेलकर, निशू तोरसकर, आदींनी चर्चेत सहभाग घेतला. (वार्ताहर)

सुवर्णकार बाजारपेठेत डायरी ठेवा : पोलिसांचे सहकार्याचे आवाहन
सुवर्णकार बाजारपेठेत प्रत्येक दहा दुकानांसमोर डायरी ठेवल्यास त्याठिकाणी येऊन पोलिस आपली नोंद ठेवतील. याला सुवर्णकारांनी आपला पाठिंबा दिला. बाजार व गल्लीत व्यवसाय करण्यासाठी फिरणाऱ्या परप्रांतीयांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून, रात्रीच्यावेळी संशयित व्यक्ती मिळाल्यास पोलिस त्याला तत्काळ चौकशीसाठी ताब्यात घेणार आहेत. आपल्या सर्वांच्या सहकार्याने चोऱ्या घडू नयेत, असा विश्वास चिंचाळकर यांनी व्यक्त केला.

Web Title: 'Policeman' to the thieves run!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.