लाच घेताना पोेलीस उपनिरीक्षक जाळ्यात
By admin | Published: June 12, 2014 12:54 AM2014-06-12T00:54:12+5:302014-06-12T00:54:48+5:30
दोडामार्गमध्ये लाचलुचपतची कारवाई : दुसरा अधिकारी निसटला
कसई दोडामार्ग : डिझेलची वाहतूक करीत असताना पकडलेली टाटा-एस गाडी सोडविण्यासाठी न्यायालयाने म्हणणे मागितले होते. याबाबत गुन्हा लवचिक करण्यासाठी दोडामार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहनकुमार दणाणे (वय २६ मूळ रा. सांगली) यांनी दहा हजारांची लाच मागितली होती. ही लाच घेताना लाचलुचपत विभागाने कारवाई केली. तर अन्य एका अधिकाऱ्याने ऐनवेळी पैसे स्वीकारले नसल्याने तो सुटला आहे. ही कारवाई दोडामार्गमधील हॉटेल विलास येथे बुधवारी करण्यात आली.
निवडणुकीच्या कालावधीत इन्सुली (ता. सावंतवाडी) येथील हेमंत सत्यवान वागळे (१८) हे टाटा एस (एमएच ०७ पी २१५२) गाडीतून डिझेलची वाहतूक करताना त्यांना दोडामार्ग येथील गोवा सीमेवर ओरोस येथील पोलीस अधिकारी हेमंत राठोड यांनी २ एप्रिलला ताब्यात घेतले होते.
ही गाडी सोडवण्यासाठी १६ मे २०१४ रोजी हेमंत वागळे यांनी न्यायालयाकडे विनंती अर्ज केला होता. त्यानुसार न्यायालयाने दोडामार्ग पोलिसांकडे याबाबतचे म्हणणे मागितले होते. पोलीस उपनिरीक्षक रोहन कुमार दवाणे यांनी हा गुन्हा आपल्याकडे असल्याने आपण न्यायालयात जे म्हणणे सादर करणार असून त्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे तुला या गुन्ह्यात मीच सोडविणार असल्याचे सांगत वागळे याच्याकडे २० हजार रुपयांची मागणी केली. वागळे याने त्यांची मागणी कबूल केली. यावेळी दणाणे यांच्या सहकाऱ्याने अशीच मागणी केली होती. दोघांचेही पैसे घेऊन वागळे दोडामार्ग येथे आला होता. तत्पूर्वीच वागळेने याबाबत कुडाळ लाचलुचपत विभागाला कळविले होते. त्यानुसार दणाणे यांचे भ्रमणध्वनी संभाषणही रेकॉर्ड करण्यात आले होते.
बुधवारी लाचलुचपत खात्याचे पथक तक्रारदारासह दोडामार्ग येथे सकाळीच पोहोचले. त्यांनी रचलेल्या सापळ्यात रोहन कुमारसह अन्य एक अधिकारी अडकणार असे वाटत होते.
पण याची कुणकुण संबंधित अधिकाऱ्याला लागली व तो यातून निसटला. नंतर हेमंत वागळे यांनी रोहन कुमार दणाणे यांना फोन केला. दहा हजार रुपये आणले आहेत आज ते घ्या, बाकीचे नंतर देतो, असे सांगितले. त्याला दवाणे तयार झाले व रंगेहात पकडले गेले. अचानक घडलेल्या प्रकारने दोडामार्गमध्ये एकच खळबळ उडाली. रोहनकुमार दणाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विराग पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊ घोसाळी, विलास कुंभार, कैतान फर्नांडिस यांनी केली.
बँकेचे कर्ज काढून वाहन खरेदी
हेमंत वागळे याने व्यवसायासाठी सहा महिन्यांपूर्वी बँकेचे कर्ज घेऊन गाडी खरेदी केली होती. या गाडीवर हॉटेल व्यवसाय चालत होता. मात्र, पोलिसांच्या मनमानी कारभारामुळे हेमंत वागळे जेरीस आला होता. ही गाडी दोडामार्ग पोलीस ठाण्यात तीन महिने सडत पडल्याने वागळे याने धाडसी पाऊल उचलले. (वार्ताहर)