विकासासाठी राजकीय पक्षांनी एकत्र यावे, दीपक केसरकर यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 06:14 PM2018-02-01T18:14:32+5:302018-02-01T18:17:16+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी संघाची एकजूट व त्यांच्यामध्ये असलेली ताकद व्यापारी मेळाव्याच्या निमित्ताने दाखवून दिली जात आहे. अशीच ताकद जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन दाखविली पाहिजे.

Political parties should come together for development, appeal to Deepak Kesarkar | विकासासाठी राजकीय पक्षांनी एकत्र यावे, दीपक केसरकर यांचे आवाहन

विकासासाठी राजकीय पक्षांनी एकत्र यावे, दीपक केसरकर यांचे आवाहन

Next

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी संघाची एकजूट व त्यांच्यामध्ये असलेली ताकद व्यापारी मेळाव्याच्या निमित्ताने दाखवून दिली जात आहे. अशीच ताकद जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन दाखविली पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्हा ही सोन्याची खाण असून ती विकसित करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. पर्यटनाच्या दृष्टीकोनातून जिल्ह्याला कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून येत्या दोन वर्षांत पर्यटनामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा केरळ, गोव्यापेक्षाही पुढे झेप घेईल, असे मत जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी जामसंडे येथील व्यापारी एकता मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघाचा ३० वा मेळावा देवगड-जामसंडे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार नीतेश राणे, हनुमंत गायकवाड, माजी आमदार अजित गोगटे, प्रमोद जठार, व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार वळंजू, नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, सभापती जयश्री आडिवरेकर, उपसभापती संजय देवरुखकर, देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे संतोष मंडलेचा, उपनगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, आशिष पेडणेकर, श्याम तळवडेकर, संदीप साटम व व्यापारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एका विशिष्ट वळणावर आला आहे. या जिल्ह्यातील प्रत्येक समुद्रकिनारा विकसित केला जाणार आहे. यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधीदेखील उपलब्ध झाला आहे.

केवळ पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्गचा विकास साधला जाणार आहे. विजयदुर्ग ते शिरोडापर्यंतचे समुद्र किनारे मे महिन्यापर्यंत विकसित केले जाणार आहेत. लेझर शो व झिप ड्राईव्हलादेखील देवगडमध्ये मान्यता मिळाली आहे. देवगड किल्ल्यावरही लेझर शोला मंजुरी देण्यात आली असून येत्या काही दिवसांत या कामांना प्रत्यक्षात सुरुवात केली जाणार आहे. पर्यटनासाठी आता निधीची कमतरता नाही. मात्र येथील जनतेचे तसेच व्यापा-यांनीही आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून पर्यटकांना योग्य त्या सुविधा द्याव्यात. देश-विदेशातील पर्यटक आकर्षिक करण्यासाठी व्यापारीवर्गाचे योगदान महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

देवगड येथे देश-विदेशातील पर्यटक येण्यासाठी आपण त्या पद्धतीच्या सोयी-सुविधा, हॉटेल व्यवसाय किंवा लॉजच्या सेवा पुरविल्या पाहिजेत. छोट्या व्यापा-यांचा तंबाखू विक्रीबाबतचा परवाना रद्द न करता दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून छोटे व्यावसायिक उद्ध्वस्त होणार नाहीत, याची दखल घेतली जाणार आहे. आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचा व्यापारी मेळावा हा महाराष्ट्रामधील आदर्शवत ठरणारा मेळावा आहे. कारण या जिल्ह्यातील व्यापा-यांची एकजूट ही महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यामधील व्यापारी संघटनेमध्ये दिसून येत नाही, असेही पालकमंत्री केसरकर म्हणाले.

स्वदेशमधून विकासाला निधी : राऊत
खासदार विनायक राऊत बोलताना म्हणाले की, या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आता सुरू झाला आहे. स्वदेश दर्शन योजनेमधून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला कोट्यवधीचा निधी उपलब्ध झाला आहे. आनंदवाडी प्रकल्पाला अंतिम मंजुरी आठ दिवसांमध्ये मिळून दोन महिन्यांमध्ये या प्रकल्पाला प्रत्यक्षात सुरुवात होईल. उद्योग क्षेत्राला चालना देणारा व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आर्थिक सुबत्ता निर्माण करणारा असा हा प्रकल्प ठरणार आहे. जीएसटीमुळे व्यापा-यांना काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. या करामध्ये सुलभता कशी आणता येईल हेदेखील राज्य शासनाने पाहिले पाहिजे. व्यापारी हा एक विकासाचा फार मोठा केंद्रबिंदू आहे. व्यापारातूनच देशाची आर्थिक उन्नती साधली जाते. त्यामुळे व्यापा-यांना करामध्ये सुलभता निर्माण झालीच पाहिजे, असे मतही विनायक राऊत यांनी व्यक्त केले.
ग्रीन रिफायनरी प्रकल्प कदापी होऊ देणार नाही : नीतेश राणे
आमदार नीतेश राणे म्हणाले की, व्यवसाय वाढण्यासाठी बाजारपेठा सुरक्षित असणे महत्त्वाचे आहे. राजकीय तसेच प्रशासकीय व्यक्तींनी सुरक्षितता राखली तर व्यावसायिकांना संधी मिळते. आॅनलाईन कारभार करीत असताना केंद्र व राज्य शासनाने पायाभूत सुविधा निर्माण केल्या पाहिजेत. व्यापा-यांमधील एकता प्रचंड प्रमाणात आहे. परंतु, राजकीय मंडळींतील एकता दिसून येत नाही. पर्यटनात देवगडला मोठे करण्याचे आपले प्रयत्न आहेत.
या दृष्टिकोनातून आपण वाटचाल करीत असताना देवगडमधील वॅक्स म्युझियम, स्कूबा डायव्हिंगची सुविधा निर्माण करून पर्यटनाला चालना देण्याचे काम येथील जनतेच्या सहकार्याने सुरू केले आहे. ग्रीन रिफायनरी प्रकल्पामुळे संपूर्ण कोकण हे उद्ध्वस्त होणार आहे. यामुळे ग्रीन रिफायनरी प्रकल्प कोकणात आपण कदापि होऊ देणार नाही. ग्रीन रिफायनरी हा विनाशकारी प्रकल्प आहे. हा प्रकल्प रामेश्वर-गिर्ये गावामध्ये होणार असल्याने येथील पर्यटनावर घाला घालण्यासारखा आहे. कितीही ताकद शासनाने, प्रशासनाने ग्रीन रिफायनरी प्रकल्प होण्यास लावली तरी आम्ही ती उधळून लावण्यास समर्थ आहोत, असेही ते म्हणाले.

Web Title: Political parties should come together for development, appeal to Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.