राजकारणाची दिशा बदलली...

By admin | Published: December 17, 2014 10:00 PM2014-12-17T22:00:55+5:302014-12-17T22:53:21+5:30

अनेक बऱ्यावाईट घटना-घडामोडींचे साक्षीदार असलेले २०१४ हे वर्ष

Politics changed direction ... | राजकारणाची दिशा बदलली...

राजकारणाची दिशा बदलली...

Next

अनेक बऱ्यावाईट घटना-घडामोडींचे साक्षीदार असलेले २०१४ हे  वर्ष काही दिवसांत काळाच्या पडद्याआड कायमचे लुप्त होईल. नव्या वर्षाच्या उदरात नक्की काय लपले आहे? याचा अंदाज बांधणे तर अशक्यच, परंतु तरीही नवा सूर्य आशेचे, उत्साहाचे किरण घेऊन येईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही. प्रत्येक क्षेत्रात जे घडले त्याच्याकडे मागे वळून पाहताना काय घडायला हवे होते व ते का घडले नाही, याचा लेखाजोखा मांडण्याचा ‘लोकमत’चा हा प्रयत्न...!
ेसिंधुदुर्ग : जिल्ह्यातील राजकीय गणिते बदलण्याचे काम सरत्या वर्षाने केले. गेल्या २५ वर्षांच्या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हा आणि नारायण राणे यांचे असलेले राजकीय समीकरण बदलण्यासाठी हे वर्ष कारणीभूत ठरले.
लोकसभा निवडणुकीत राणेंचे सुपूत्र माजी खासदार नीलेश राणे यांचा झालेला पराभव आणि त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत खुद्द नारायण राणेंचा पराभव झाल्याने मोठ्या राजकीय उलथापालथीने हे वर्ष गाजले. त्यातच राणेंचा पराभव होताना दुसरे सुपूत्र नीतेश राणे यांनी कणकवली मतदार संघातून पहिल्यांदाच विधानसभेत एंट्री केली. त्यामुळे ‘कही खुशी, कही गम’ अशी स्थिती बनली. यावर्षाच्या सुरूवातीलाच म्हणजे जानेवारीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी काँग्रेस आणि पर्यायाने नारायण राणे यांच्याविरोधात रान उठवायला सुरूवात केली होती. त्यातून आमने-सामनेची घटना कणकवलीत घडली. त्यात राडा झाला आणि यातूनच वैभव नाईक यांनी खऱ्या अर्थाने बाजी मारत लोकांमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले. विधानसभा निवडणुकीत राणेंचा पराभव करून ते जायंट किलर ठरले.
शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील तीन पैकी दोन आमदार निवडून आणत नारायण राणेंना शह देताना पुन्हा भगवी वातावरण निर्माण केले. तर भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोंदीनाही प्रचारात आणूनही प्रमोद जठार यांची जागा ते वाचवू शकले नाही. नीतेश राणे यांनी कणकवली मतदार संघात बाजी मारत राणेंची विधानसभेतील जागा भरून काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सिंधुदुर्गातील राजकारणात गेल्या वर्षभरात अनेक बदल घडले. या सर्व बदलांमध्ये राणे फॅक्टर मागे पडून आता नव्याने केसरकर फॅक्टरचा उदय झाला आहे.

राणेंना पराभवाचा धक्का
लोकसभा निवडणुकीत पूत्र नीलेश राणे याचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत स्वत:च्या झालेल्या पराभवाचा मोठा धक्का माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना बसला.


दीपक केसरकर बनले मंत्री
शिवसेनेने दीपक केसरकर यांना राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश देत सावंतवाडीतून आमदारकीसाठी तिकीट दिले. लोकसभेतील केलेल्या मदतीची परतफेड केली.
केसरकर यांनी या संधीचा लाभ उठवत दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मान मिळविताना मोठे मताधिक्य मिळविले. त्यामुळे सेनेने त्यांना ग्रामविकास राज्यमंत्री बनविले.

महेश सरनाईक

Web Title: Politics changed direction ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.