कणकवली तालुक्यात सरासरी 70 टक्के शांततेत मतदान , 9 ग्रामपंचायती बिनविरोध 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 10:34 PM2017-10-16T22:34:03+5:302017-10-16T22:34:20+5:30

कणकवली तालुक्यातील 58 पैकी 49 ग्रामपंचायतींसाठी सोमवारी शांततेत सरासरी 70 टक्के मतदान झाले. तालुक्यात सरपंच व सदस्य पदासाठीच्या  712 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.

Polling in Kankavali taluka, 70 percent peaceful polling, 9 gram panchayat unanimously | कणकवली तालुक्यात सरासरी 70 टक्के शांततेत मतदान , 9 ग्रामपंचायती बिनविरोध 

कणकवली तालुक्यात सरासरी 70 टक्के शांततेत मतदान , 9 ग्रामपंचायती बिनविरोध 

Next

कणकवली : कणकवली तालुक्यातील 58 पैकी 49 ग्रामपंचायतींसाठी सोमवारी शांततेत सरासरी 70 टक्के मतदान झाले. तालुक्यात सरपंच व सदस्य पदासाठीच्या  712 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. 9 ग्रामपंचायती पूर्णतः बिनविरोध झाल्या आहेत. 
 कणकवली तालुक्यातील 49 गावात सोमवारी मतदान झाले. या प्रक्रियसाठी  1184 कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते . सकाळी 7.30 वाजल्या पासून मतदानाला प्रारंभ झाला.
 ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची  गेले दहा दिवस जोरदार सुरु असलेली रणधुमाळी मतदानानंतर संपली. आता मंगळवारी मतमोजणीनंतर काय निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रांताधिकारी नीता शिंदे- सावंत , तहसीलदार वैशाली माने, निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती.  काही ठिकाणी शाब्दिक बाचाबाचीच्या घटनांव्यतिरिक्त  कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान झाले.
 कणकवली तहसील कार्यालयाकडून  रविवारी मतदान प्रकियेसाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी मतदान यंत्र तसेच  साहित्य घेवून आपल्या नियोजित मतदान केंद्रावर रवाना झाले होते. यामध्ये मतदान केंद्राध्यक्षांसहित मतदान अधिकारी, व्यवस्थापक, पोलिस कर्मचारी , होमगार्ड यांचा समावेश होता. सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता मतदानाची मुदत संपल्यानंतर हे कर्मचारी मतदान यंत्रे पुन्हा जमा करण्यासाठी येथील तहसील कार्यालयात दाखल झाले. रात्री उशिरा पर्यन्त ही प्रक्रिया सुरु होती.
तालुक्यातील 45 सरपंच पदासाठी 116 उमेदवार तर 298 सदस्यांसाठी 596 उमेदवार रिंगणात आहेत.  सरपंच व सदस्य पदासाठी तालुक्यात 712 उमेदवार रिंगणात आहेत. हे उमेदवार निवडण्यासाठी सोमवारी झालेल्या मतदाना नंतर त्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.
मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कड़क बंदोबस्त ठेवला होता.  पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी कार्यरत होते.दंगा काबू पथकही तैनात करण्यात आले होते.
कणकवली तालुक्यात 188 मतदान केंद्रे होती . मात्र, तालुक्यातील 9 ग्रामपंचायती पूर्णतः बिनविरोध झाल्याने तसेच काही ठिकाणी सदस्य बिनविरोध झाल्याने सोमवारी 160 मतदान केंद्रांवर मतदान झाले.
तहसीलदार वैशाली माने यांनी मतदान केंद्रांवर भेट देवून आढावा घेतला. आमदार नीतेश राणे यांनी वरवड़े फ़णसवाडी येथे मतदान केंद्रावर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मतदानाचा हक्क बजावला. तर कासार्डे येथे भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार प्रमोद जठार यांनी मतदान केले.
तालुक्यात  मतदान शांततेत झाले असले तरी काही ठिकाणी उमेदवारामध्ये शाब्दिक बाचाबाचीच्या घटना घडल्या. तालुक्यातील लोरे नंबर 1 ग्रामपंचायतीसाठी दुपारी 3.30 वाजेपर्यन्त 75 टक्के, फोंडा 52 टक्के, कलमठ 55 टक्के, खारेपाटण 55 टक्के, तळेेरे 65 टक्के, कासार्डे 68 टक्के, सांगवे ग्रामपंचायतीसाठी 55 टक्के मतदान झाले होते. सायंकाळी 5.30 वाजेपर्यन्त मतदानाची मुदत संपेपर्यन्त मतदानाची ही टक्केवारी वाढली होती.

तालुक्यात सरासरी 70 टक्के मतदान!
कणकवली तालुक्यात सकाळी 7.30 ते 9.30 या कालावधीत 15.9 टक्के मतदान झाले. यामध्ये 7392 पुरुष व 4816 स्त्रियानी अशा एकूण 12248 मतदारांनी मतदान केले.  सकाळी 11.30 वाजेपर्यन्त 35.05 टक्के मतदान झाले. यामध्ये 14,166 पुरुष व 12, 759 स्त्रीयांनी अशा एकूण 26925 मतदारांचा समावेश होता.   दुपारी 1.30 वाजेपर्यन्त 46.61टक्के मतदान झाले. यामध्ये 17,201 पुरुष व 18,597स्त्रियांनी अशा एकूण 35,798 मतदारांचा समावेश होता. दुपारी 3.30 वाजेपर्यन्त 61.32 टक्के  मतदान झाले. यामध्ये 23,987 पुरुष तर 23,109 स्त्रीया अशा एकूण 47,096 मतदारांनी मतदान केले. सायंकाळी 5.30 वाजेपर्यन्त सुमारे  70 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. मात्र, मतदान केंद्रावरील साहित्य घेवून कर्मचारी तहसील कार्यालयात उशिरापर्यन्त दाखल होत असल्याने त्याबाबत अधिकृत आकडेवारी समजू शकली नाही.

निकाल होणार आज स्पष्ट!
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी मतदान झाल्यानंतर मंगळवारी येथील तहसील कार्यालयात सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदान यंत्रात भवितव्य बंद झालेल्या उमेदवारांमधून कोण विजयी होणार याबाबतचा निकाल त्यावेळीच स्पष्ट होणार आहे. 14 टेबलवर एकाच वेळी मतमोजणी होणार आहे.
 

Web Title: Polling in Kankavali taluka, 70 percent peaceful polling, 9 gram panchayat unanimously

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.