सनराईज कंपनीला ‘प्रदूषण’ची नोटीस
By admin | Published: January 28, 2016 12:04 AM2016-01-28T00:04:04+5:302016-01-28T00:16:32+5:30
कारवाईचा इशारा : कन्व्हेअर बेल्टमुळे धुळीचे प्रमाण वाढले
दापोली : तालुक्यातील उंबरशेत येथे सनराईज मरीन एंटरप्रायझेस बार्जमध्ये बॉक्साईट भरण्यासाठी उभारलेल्या कन्व्हेअर बेल्टमुळे उडणाऱ्या धुळीचे प्रमाण विहीत पातळीपेक्षा जास्त आढळल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर येथील प्रादेशिक कार्यालयाने या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, सात दिवसात उत्तर न दिल्यास कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असही या नोटीशीत म्हटले आहे.
उंबरशेत येथे आशापुरा माईनकेम बॉक्साईटची वाहतूक मंंडणगड तालुक्यातील साखरी येथील जेटीपर्यंत डंपरद्वारे केली जात असून, हे अंतर २६ किमी आहे. हे अंतर जास्त असल्याने सनराईज मरीन एंटरप्रायझेसने उंबरशेत येथे खाडीकिनारी कन्व्हेअर बेल्ट उभारला आहे. या बेल्टमधून बार्जमध्ये बॉक्साईट भरले जाते. हे अंतर केवळ ५ किमी असल्याने आशापुरा कंपनीचा लाखो रुपयांचा वाहतूक खर्च वाचला आहे. मात्र, कन्व्हेअर बेल्टच्या ठिकाणी डंपरमधून बॉक्साईट उतरवताना व कन्व्हेअर बेल्टमधून ते बार्जमध्ये भरताना मोठ्या प्रमाणात धूळ उडत असल्याने परिसरातील घरांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. येथील मशीद, शाळा व घरांमध्ये धुळीचे साम्राज्य पसरते. याला कंटाळून परिसरातील ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रार केल्यानंतर २ जानेवारी रोजी तहसीलदार कल्पना गोडे यांनी परिसराला भेट देऊन पाहणी केली.
ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीत त्यांना तथ्य आढळून आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या चिपळूण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी उंबरशेत येथे येऊन कन्व्हेअर बेल्ट सुरु असताना उडणाऱ्या धुळीचे प्रमाण मोजले असता ते विहीत पातळीपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. या कार्यालयाने आपल्या कोल्हापूर येथील प्रादेशिक कार्यालयाला याबाबत आपला अहवाल ६ जानेवारी रोजी सादर केला. त्याची गंभीर दखल घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी सनराईज मरीन एंटरप्रायझेस कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच २८ जानेवारी रोजी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर येथील प्रादेशिक कार्यालयात सुनावणी होणार
असल्याची माहिती देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
केदार साठे : ‘आशापुरा’विरोधात उपोषण
दापोली तालुक्यातील केळशी - उटंबर येथील नागरिकांचे जीवन असह्य करणाऱ्या आशापुरा कंपनीच्या विरोधातही येथील भाजपचे उपजिल्हाध्यक्ष केदार साठे व उटंबर ग्रामस्थांनी २६ जानेवारीपासून दापोली तहसील कार्यालयासमोर आपले उपोषण सुरू केले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही हे उपोषण सुरुच होते.
आंदोलन मागे
बुधवारी सायंकाळी उशिरा साठे यांनी आपले उपोषण मागे घेतले. आशापुरा कंपनीविरोधात कारवाईचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.