‘त्या’ प्रदूषणकारी प्रकल्पाची चौकशी करणार
By Admin | Published: December 22, 2014 12:21 AM2014-12-22T00:21:41+5:302014-12-22T00:21:41+5:30
दीपक केसरकर : पर्यटन हॉटस्पॉटवर प्रकल्प कसा?
सावंतवाडी : टाटा कन्सल्टन्सीच्या अहवालाप्रमाणे आरोंदा पर्यटनाचा हॉटस्पॉट म्हणून विकसित करायचा आहे. असे असताना प्रदूषणकारी प्रकल्पाला या ठिकाणी मंजुरी कशी काय देण्यात आली याची चौकशी केली जाईल. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून देऊ, असे वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
सावंतवाडी येथे झालेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते. जिल्हाधिकारी ई. रवींद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनिता साहू, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, उपवनसंरक्षक रमेशकुमार, अभियंता प्रकाश शिंदे, तहसीलदार सतीश कदम, आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यमंत्री केसरकर म्हणाले, मी गावातील लोकांच्या भावनेचा आदर करतो. तेथील लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या आहेत. टाटा कन्सल्टन्सीच्या अहवालाप्रमाणे सिंधुदुर्गचे अनेक भाग हे पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याचे ठरवण्यात आले. त्याप्रमाणे आरोंद्यामधील तेरेखोल खाडी ही पर्यटनदृष्ट्या विकसित करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
एखादा प्रदूषणकारी प्रकल्प जर पर्यटनाच्या ठिकाणी आणायचा असेल तर शासनाची उच्चस्तरीय समिती नेमली गेली आहे. त्या समितीने त्या प्रकल्पाला परवानगी द्यावी लागते, अशी परवानगी संबंधित कंपनीने घेतली आहे का, हे तपासावे लागणार असून त्यानंतरच या ठिकाणी प्रकल्पाबाबत विचार करावा लागणार आहे.
रस्ता अडवला अशी तक्रार तेथील ग्रामस्थांची असल्यास त्याची चौकशी होईल आणि सत्य काय ते बाहेर येईल. आम्ही आरोंदा जेटीबाबत सर्व बाबी पूर्वग्रहदोष न ठेवता शासनाच्या निदर्शनास आणून देऊ आणि नंतर शासन काय तो निर्णय घेईल, असेही यावेळी मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले. आरोंदा खाडीत असलेली हाऊस बोट तारकर्लीला हलवल्याबाबत मंत्री केसरकर यांनी सांगितले की, बोट हलवली तरी टाटा कन्सल्टन्सीचा अहवाल जाग्यावरच आहे. त्यामुळे आरोंदा हा हॉटस्पॉट करण्यात आला आहे, असेही यावेळी सांगितले.
प्रकल्पाला स्थगिती देण्याबाबत अहवाल मागवणार
आरोंदा जेटी प्रकल्पाला स्थगिती देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही, पण सर्व कागदपत्रे पाहिली जातील. त्यानंतर ग्रामस्थांवर होणारा अन्याय तसेच प्रकल्पाचा भविष्यात उद्भवणारा धोका लक्षात घेऊन स्थगितीबाबत विचार करू, असे मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले.
आरोंदा जेटीची चौकशी करा : खासदार राऊत
आरोंदा जेटीवर घालण्यात आलेली भिंत ग्रामस्थांवर अन्याय करणारी असून या जेटीचा अहवाल तातडीने मला द्या, असे आदेश बंदर विभागाचे अभियंता सदाशिव इंगळे यांना दिले. तुम्ही जर हा अहवाल दिला नाही तर तुमच्या चौकशीसाठी समिती नेमावी लागेल, असेही यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले. (प्रतिनिधी)