सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले गावाची 'पुस्तकाचे गाव' म्हणून निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 05:00 PM2022-03-26T17:00:10+5:302022-03-26T17:00:36+5:30

तळेरे : मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी पुस्तकांचे गाव ही संकल्पना राज्य शासन राबवित आहे. पुस्तकांचे गाव विस्तार योजनेंतर्गत कोकण ...

Pombhurle village in Sindhudurg district selected as Book Village | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले गावाची 'पुस्तकाचे गाव' म्हणून निवड

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले गावाची 'पुस्तकाचे गाव' म्हणून निवड

Next

तळेरे : मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी पुस्तकांचे गाव ही संकल्पना राज्य शासन राबवित आहे. पुस्तकांचे गाव विस्तार योजनेंतर्गत कोकण महसूल विभागात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले गावाची 'पुस्तकाचे गाव' म्हणून निवड करण्यात आली. आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्म ठिकाण म्हणून हे गाव परिचित असुन यामुळे पुन्हा एकदा पोंभुर्ले गाव प्रकाशझोतात येणार आहे.

पुस्तकाचे गाव विस्तार योजनेंतर्गत मराठी भाषेचा विकास, प्रचार, प्रसार व वाचन संस्कृती जोपासावी यादृष्टीने शासन विविध योजना आखत आहे. पुस्तकांचे गाव ही त्यातील एक महत्वपूर्ण योजना असुन त्याची व्यापकता वाढविण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यात एक पुस्तकांचे गाव सुरु करुन योजनेचा विस्तार करण्याचा शासनाचा मनोदय आहे. शुक्रवारी झालेल्या शासन निर्णयानुसार कोकण विभागातून देवगड तालुक्यातील पोंभुर्ले गावाची निवड करण्यात आली आहे. याबाबतचा शासनाकडे माणुसकी फाऊंडेशनने प्रस्ताव केला होता.

पुस्तकाच्या गावात विविध प्रकारच्या साहित्य, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवास वर्णन अशा सर्वांगीण ग्रंथांनी सुसज्ज असे भव्यदिव्य दालने होणार आहेत. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मदत होईल. यापूर्वी पोंभुर्ले गाव आद्य पत्रकार बाळशास्त्री जान्भेकर यांचे जन्मस्थळ म्हणुन प्रसिध्द आहेच. मात्र, पुस्तकांचे गाव जाहिर झाल्याने पर्यटन वृध्दिसाठी निश्चितच त्याचा फायदा होऊ शकेल.

शिवाय ज्येष्ठ लोकांना वाचन खाद्य उपलब्ध होईल. पुस्तकांचे गाव पाहण्यास येणार्या पर्यटकांमुळे रोजगार उपलब्ध होऊ शकेल. ऐतिहासिक असलेल्या या गावाला आता पर्यटनदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी माणुसकी फाऊंडेशनही प्रयत्नशील आहे.

कोकतील पहिले पुस्तकांचे गाव

राज्यभरातील पत्रकार पोंभुर्ले येथे येउन दरवर्षी 6 जानेवारीला पत्रकार दिन साजरा करतात. पोंभुर्ले गावाला शासनाने कोकणातील पहिले पुस्तकांचे गाव जाहिर केल्याने पोंभुर्ले गाव पुन्हा एकदा पर्यटनदृष्ट्या नजरेत येणार आहे.

पुस्तकांचे गाव या योजनेचा विस्तार करण्यासाठी शासन निर्णयाव्दारे औरंगाबाद महसूल विभागात वेरूळ जि. औरंगाबाद, नागपूर विभागात नवेगाव बांध, जि. गोंदिया, कोकण विभागात पोंभुर्ले, जि. सिंधुदुर्ग व पुणे विभागात अंकलखोप (औदुंबर) जि. सांगली या गावात पुस्तकांचे गाव योजनेचा विस्तार करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.


पुस्तकांचे गाव या योजनेमुळे पोंभुर्ले गाव पुन्हा सर्वांसमोर येईल. यामुळे पर्यटन वाढीस चालना मिळेल. वाचनसंस्कृती वाढीस लागेल आणि गावातील लोकांना रोजगार उपलब्ध होईल. - सादिक डोंगरकर, सरपंच पोंभुर्ले


पोंभुर्ले गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, ती दुरवर जावी. त्यासाठी पर्यटक गावात यावेत, रोजगार वाढावा यासाठी आमचे प्रयत्न होते. या गावाला शासनाने पुस्तकांचे गाव जाहिर केल्यामुळे त्याला अधिक बळकटी येईल.  - प्रसाद मालपेकर, संस्थापक अध्यक्ष माणुसकी फाऊंडेशन, पोंभुर्ले

Web Title: Pombhurle village in Sindhudurg district selected as Book Village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.