Sindhudurg: वाफोलीत कालव्याचे निकृष्ट बांधकाम कोसळले, लाखोंचा निधी पाण्यात
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: August 10, 2023 12:34 PM2023-08-10T12:34:57+5:302023-08-10T12:36:30+5:30
शेतकरी अद्यापही पाण्याच्या प्रतिक्षेत
बांदा (सिंधुदुर्ग) : तिलारी कालव्याच्या बांदा शाखा कालवा अंतर्गत वाफोली गावातील दीड महिन्यांपूर्वी दुरुस्ती केलेल्या कालव्याचे बांधकाम कोसळले. लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेल्याने जलसंपदा विभाग तोंडघशी पडला आहे. संबंधित ठेकेदाराने याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला अंधारात ठेवले होते. कालवा विभागाच्या अधिकार्यांना हाताशी धरुन केलेल्या निकृष्ट कामांबाबत स्थानिक ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. कालवा शेतकर्यांसाठी, अधिकार्यांसाठी की ठेकेदारांसाठी ? असा खोचक सवाल वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस यांनी उपस्थित केला.
तिलारी कालवा व निकृष्ट काम हे एक समीकरणच बनले आहे. तिलारी कालवा शेतकर्यांसाठी की ठेकेदार व अधिकार्यांसाठी असा प्रश्न गेली दहा वर्षे सातत्याने उपस्थित केला जात आहे. शेती व बागायतीला तिलारीचे पाणी मिळेल या भाबड्या आशेने स्थानिक शेतकर्यांनी लाख मोलाच्या जमिनी अत्यंत कवडीमोलाने या प्रकल्पासाठी दिल्या. मात्र, तीन तपाचा कालावधी उलटला तरीही शेतकरी मात्र अद्यापही पाण्याच्या प्रतिक्षेत आहे.
वाफोली हरिजनवाडी नजीक कालव्याची दुरुस्ती जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत करण्यात आली होती. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते. स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला मात्र याबाबत अंधारात ठेवण्यात आले. त्या कामाच्या दर्जाबाबत स्थानिक ग्रामस्थांकडून शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. मात्र, अधिकार्यांच्या आशिर्वादाने संबंधित ठेकेदाराने घाईगडबडीत हे काम उरकले होते. त्यामुळे केवळ दीड महिन्यातच ही भिंत कोसळली व कामाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.