दारिद्र्याला कंटाळून दाम्पत्याने बालकालाच विकले

By admin | Published: April 25, 2015 12:47 AM2015-04-25T00:47:15+5:302015-04-25T01:10:24+5:30

मळेवाड येथील घटना : पाच हजाराला गोव्यात विक्री; पोलिसांकडून चौकशी, तक्रार नाही

The poor husband is sold by the couple to the child only | दारिद्र्याला कंटाळून दाम्पत्याने बालकालाच विकले

दारिद्र्याला कंटाळून दाम्पत्याने बालकालाच विकले

Next

सुभाष परूळेकर / मळेवाड
पदरी अठराविश्व दारिद्र्य, कुणाकडे तरी मोलमजुरी करायची आणि दोन वेळची पोटाची खळगी भरायची; पण आपणालाच मिळत नाही, तेथे मुलाला कोठून घालायचे, अशा विवंचनेत असलेल्या मळेवाड - जांभळीचे भरड येथे भाड्याने राहणाऱ्या एका दाम्पत्याने आपल्या चार महिन्यांच्या बालकालाच चक्क गोव्यात विकले. पहिल्यांदा मूल चोरीला गेल्याचा बनाव करणाऱ्या या दाम्पत्याला ग्रामस्थांनी हिसका दाखवताच, होय, मी मुलाला पाच हजार रुपयांना विकल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत उशिरापर्यंत पोलिसांत तक्रार दाखल झाली नव्हती. आरोंदा दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी झापू पवार यांनी या दाम्पत्याची चौकशी केली.
मूळचे बांदा-देऊळवाडी येथील खेमराज व गीता सावंत हे दाम्पत्य काही महिन्यांपूर्वीच मळेवाड सीमेवरील जांभळीचे भरड येथे राहण्यासाठी आले. तेथीलच एका ग्रामस्थाच्या पडवीत त्यांनी संसार थाटला. सकाळी कुणाच्या तरी कामावर जायचे आणि संध्याकाळी यायचे. कोणी पैसे दिले तर जेवण, अन्यथा रात्र तशीच काढायची, असा त्यांचा दिनक्रम होता. या दाम्पत्याने २२ डिसेंबर २०१४ रोजी अपत्याला जन्म दिला होता. चार महिने हे अपत्य त्यांच्यासोबत आहे. कुठेही कामाला जाताना त्याला पोटाशी गुंडाळून आई काम करीत असे. हळूहळू या दाम्पत्याला त्याला खायला घालायचे ओझे होऊ लागले. अनेक वेळा या मुलाला विकण्याचा घाट या दाम्पत्याने घातला होता; पण त्यांना यश येत नव्हते.
अखेर या मुलाच्या पित्याने गुरुवारी रात्री बनाव रचला. माझ्या मुलाला कोणीतरी उचलून नेले, असे ओरडून तो सांगत होता. काहीसे वेडसर स्वभावाच्या या दाम्पत्याच्या ओरडण्याकडे ग्रामस्थांनी प्रथम दुर्लक्ष केले. परंतु, शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांनी प्रत्यक्ष जाऊन पाहिले असता त्यांचा मुलगा खरोखरच तेथे नसल्याचे दिसून आले. मूल हरवल्याचे कोणतेही दु:ख त्यांच्या चेहऱ्यावर नव्हते. दोघांनी सांगितलेल्या माहितीमध्येही विसंगती दिसल्याने ग्रामस्थांनी दोघांना फैलावर घेताच मुलाला विकल्याचे बेधडकपणे त्यांनी सांगितले. घटनेची माहिती आरोंदा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल झापू पवार यांना दिली असता त्यांनी खेमराजची चौकशी केली; पण आपली तक्रार नाही, असे सांगितल्याने पोलीसही काही करू शकले नाहीत. याबाबत पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांनीही आमच्याकडे तक्रार आली नसल्याचा दुजोरा दिला.
 

Web Title: The poor husband is sold by the couple to the child only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.