नवी मुंबईतील १४ वर्षीय मुलगी पोचली वैभववाडीत
By admin | Published: April 3, 2017 01:56 PM2017-04-03T13:56:27+5:302017-04-03T13:56:27+5:30
तीन दिवसांपासून बेपत्ता, नवी मुंबई पोलिसात तक्रार
आॅनलाईन लोकमत
वैभववाडी, दि. ३ : ऐरोलीतून(नवी मुंबई) बेपत्ता झालेली १४ वर्षीय मुलगी वैभववाडी पोलीस ठाण्यात पोहोचली. प्राजक्ता जितेंद्र तोरणे असे तिचे नाव आहे. ती कोकण कन्या एक्स्प्रेसने वैभववाडी स्थानकावर उतरली होती. तिची हालचाल संशयास्पद वाटल्याने एका वाहनचालकाने तिला पोलीस ठाण्यात आणून पोचविले. मानसिक स्थिती ठीक नसल्याने तिच्याजवळील मोबाईल क्रमांकामुळे नातेवाईकाशी संपर्क साधणे पोलीसांना शक्य झाले.
याबाबत पोलिसांतंन मिळालेली माहिती अशी की, मुंबईहून येणाऱ्या कोकण कन्या एक्स्प्रेसमधून ही मुलगी वैभववाडी स्थानकात उतरली. ती एकटी असल्याने स्थानकावरील लोकांना संशय आला. विचारपूस करताना तिच्याकडून नीट प्रतिसाद मिळत नसल्याने रेल्वे स्थानकावरील एका रिक्षा चालकाने तिला पोलीस ठाण्यात आणून सोडले.
पोलिसांनी तिच्याकडे विचारपूस केली. मात्र, ती नीट काहीच सांगत नव्हती. तिच्याकडे एक मोबाईल क्रमांक सापडला. त्यावर पोलीसांनी संपर्क साधला तेव्हा तो क्रमांक प्राजक्ताच्या वडीलांचा असल्याचे स्पष्ट झाले.
प्राजक्ता तीन दिवसांपासून बेपत्ता असून नवी मुंबईतील रबाळे एमआयडीसी पोलिसात त्याबाबत तक्रार दिली असल्याचे तिचे वडील जितेंद्र तोरणे यांनी सांगितले. प्राजक्ताचे नातेवाईक नवी मुंबईहून सकाळीच वैभववाडीला येण्यास निघाले असून ते आल्यावर प्राजक्ताला त्यांच्या ताब्यात देणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.