शिक्षणमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
By admin | Published: April 10, 2016 09:32 PM2016-04-10T21:32:04+5:302016-04-11T01:10:24+5:30
राजन साळवी : वाकेड शाळेत ‘आयएसओ’ मानांकन प्रदान सोहळा
वाटूळ : वीस पटांच्या मराठी शाळा वाचविण्याबाबत विधानसभेमध्ये कोकणातील आमदारांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता, या शाळांना अभय मिळण्यासाठी शासन विचाराधीन असल्याचे आमदार राजन साळवी यांनी सांगितले.
वाकेड जिल्हा परिषद आदर्श शाळा नं. २ ‘आयएसओ’ मानांकन प्रदान सोहळ्यामध्ये ते बोलत होते. लांजा तालुक्यातील पहिले संयुक्त ‘आयएसओ’ मानांकन वाकेड शाळेने प्राप्त केले आहे. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, शिक्षण व अर्थ सभापती विलास चाळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर, लांजा सभापती लिला घडशी, उपसभापती प्रियांका रसाळ, शिवसेना तालुका प्रमुख संदीप दळवी, गटशिक्षणाधिकारी विनोद सावंत, अधीक्षक संतोष कठाळे उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्हा लवकरच प्रगत महाराष्ट्र अभियानामध्ये राज्यात प्रथमस्थानी असेल, असा विश्वास एकनाथ आंबोकर यांनी व्यक्त केला. आपल्या जिल्हा परिषद गटामधील पाच शाळांना ‘आयएसओ’ मानांकन मिळाले हे आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे जगदीश राजापकर यांनी सांगितले. जिल्हा परिषद मराठी शाळांना प्रोत्साहन देणे व त्यांचा दर्जा सुधारणे यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे शिक्षण व अर्थ सभापती विलास चाळके यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक संतोष सोळंके तसेच शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. सरपंच गोपाळ सावंत यांनी महामार्ग चौपदरीकरणामध्ये शाळेचा अर्धा भाग जात असल्याने दुमजली इमारत मंजूर व्हावी, अशी मागणी केली. कार्यक्रमाला सुषमा राड्ये, विभाश शेट्ये, जयवंत जाधव, राघो भितळे, मुरलीधर पांचाळ, दिनेश पांचाळ उपस्थित होते. (वार्ताहर)