म्हाप्रळ रेती बंदर परिसरात पाच सक्शन बोटी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2016 11:23 PM2016-04-07T23:23:19+5:302016-04-07T23:57:52+5:30

मंडणगड तालुक्यात महसूल विभागाची कारवाई

In possession of five suction boats in the area of ​​Mahpral Rati Bandar area | म्हाप्रळ रेती बंदर परिसरात पाच सक्शन बोटी ताब्यात

म्हाप्रळ रेती बंदर परिसरात पाच सक्शन बोटी ताब्यात

googlenewsNext

मंडणगड : तहसीलदार कविता जाधव यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने गुरुवारी म्हाप्रळ रेती बंदर परिसरात धडक कारवाई करून पाच सक्शन बोटी ताब्यात घेतल्या. याबाबत पंचनाम्याची कार्यवाही दिवसभर सुरू होती. तालुक्यात सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपसा व बेकायदेशीर वाळू वाहतुकीविरोधात गेल्या तीन दिवसांत थेट कारवाई करण्यात आली आहे.
यासंदर्भात तहसीलदार कविता जाधव यांनी अधिक माहिती दिली. गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास म्हाप्रळ रेती बंदर परिसरात कारवाईसाठी गेल्या असताना सावित्री नदीपात्रात म्हाप्रळ आंबेत पुलाजवळ अनेक सक्शन बोटी पाण्यात वाळू उपसा करताना आढळून आल्या. हा उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाचे पथक नदीत उतरत असताना अनेक बोटी उपसा थांबवून जागेवरून गायब झाल्या, तर जागेवर सापडलेल्या पाच बोटी ताब्यात घेण्यात आल्या. म्हाप्रळ रेती बंदर परिसरात सक्शन पंपाच्या मदतीने वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारीत तथ्य असल्याचे गुरुवारच्या कारवाईने निष्पन्न झाले.
महसूल विभागाने नदीपात्रात प्रत्यक्ष उत्खनन करताना बोटी पकडल्याने वाळू व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. महसूल विभागाच्या भीतीने अनेक बोटी रायगड जिल्ह्यात हलवण्यात आल्या. दुसरीकडे म्हाप्रळ व आंबेत या दोन्ही गावांतील वाळू व्यावसायिक वाळू उत्खनन करीत असल्याची बाबही महसूल विभागाच्या निदर्शनास आली आहे.
या कारवाईत निवासी नायब तहसीदार अनिल कांबळे, मंडल अधिकारी अनिल कुळ्ये व दशरथ पुलारे यांनी भाग घेतला़ दरम्यान, सोमवारी (दि. ४) पोलिसांनी शेनाळे घाटात रात्री उशिरा केलेल्या कारवाईत बनावट रॉयल्टीच्या आधारे दोन ब्रास अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरविरोधात एक लाख ८०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. कायद्यातील तरतुदीनुसार डंपर मालक लुकमान चिखलकर यांना लावलेला दंड महसूल विभागाने केवळ नोटीस न बजावता प्रत्यक्षात वसूलही केला आहे़ दरम्यान, अनधिकृत वाळू वाहतुकीविरोधात पोलिस प्रशासनाकडून सरसकट कारवाई होत नसल्याने पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ लागले आहेत. (प्रतिनिधी)

महसूल कर्मचाऱ्यांचे पथक तैनात राहणार
एप्रिल महिन्यात तलाठ्यांना आॅनलाईन सातबारा अपग्रेडेशनच्या कामाचा भार असल्याने तहसील कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे पथक खाडीपात्रात तैनात राहणार आहे. याठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशाविरोधात रात्रीही कारवाई करणार असल्याचे संकेत तहसीलदार कविता जाधव यांनी दिले आहेत़
कामगारांचे पलायन
महसूल विभागाचे पथक धडक कारवाईसाठी येत असल्याचे पाहून बोटीतील सर्व कामगारांनी पाण्यात उडी मारुन घटनास्थळावरून पलायन केल्याने या बोटी नेमक्या कोणाच्या मालकीच्या आहेत, या संदर्भात महसूल विभागास अधिक माहिती कळू शकलेली नाही.

Web Title: In possession of five suction boats in the area of ​​Mahpral Rati Bandar area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.