देवगडात काँग्रेसविरोधात महायुतीची शक्यता

By admin | Published: November 10, 2016 11:29 PM2016-11-10T23:29:09+5:302016-11-11T00:06:10+5:30

आज फैसला होणार : राष्ट्रवादी युतीमध्ये सामील होणार?; कॉग्रेसची स्वबळावर लढत

The possibility of Mahayuti against the Congress in Devgad | देवगडात काँग्रेसविरोधात महायुतीची शक्यता

देवगडात काँग्रेसविरोधात महायुतीची शक्यता

Next

अयोध्याप्रसाद गावकर -- देवगड -जामसंडे नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा प्रारंभ केला आहे. काँग्रेस स्वबळावरती निवडणूक लढवीत आहे, तर सेना-भाजपची युती झाली आहे. या युतीमध्ये राष्ट्रवादीला घेऊन महायुती होण्याचीही शक्यता असून, त्याचे चित्र आज, शुक्रवारी स्पष्ट होणार आहे.
देवगड-जामसंडे नगरपंचायतीची ही पहिली निवडणूक असून, या निवडणुकीमध्ये सत्ता काबीज करून आपापला नगराध्यक्ष बसविण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करीत आहे. छाननीमध्ये १७ जागांसाठी ७१ अर्ज राहिले आहेत. यामधील प्रभाग क्रमांक ८ मधील भाजपचे बंडखोर उमेदवार संजय बांदेकर, अपक्ष रामदास अनंत अनभवणे आणि प्रभाग क्रमांक १ मधून रवींद्र शेडगे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे ६८ उमेदवार रिंगणात असून आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने कोणकोणते उमेदवार आपले उमेदवारी अर्ज मागे घेणार हे स्पष्ट होणार आहे.
भाजप, सेना व राष्ट्रवादी या महायुतीची बोलणी अखेरपर्यंत चालू असून राष्ट्रवादीतील एक गट व शिवसेनेतील काही कार्यकर्ते व भाजपचे काही वरिष्ठ व स्थानिक कार्यकर्तेही महायुती होण्यासाठी प्रयत्नात असल्याचे सांगण्यात येत आहे. महायुती अखेरच्या टप्प्यात झाली तर काँग्रेसविरुद्ध महायुती अशी देवगड-जामसंडे नगरपंचायतीमध्ये दुरंगी लढत होणार आहे.
काँग्रेसची प्रचाराची संपूर्ण धुरा आमदार नीतेश राणे यांच्याकडे असून, त्यांची प्रचाराची रणनीती वेगळीच आहे. तसेच भाजपही प्रचारात वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून मतदारांची मने आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यामुळे देवगड-जामसंडे नगरपंचायतीची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाची आघाडी होण्याची चिन्हे नाहीत. काँग्रेस विकासाच्या मुद्द्यावर स्वबळावरती निवडणूक लढवीत आहेत. सध्या सेना-भाजप व राष्ट्रवादी हे तीनही पक्ष काँग्रेसविरोधी असल्याचे दिसून येत आहे.
निवडणुकीमध्ये भाजप-सेनेच्या युतीत राष्ट्रवादी पक्ष सहभागी झाला नसला तरी छुप्या पद्धतीने सेना-भाजप व राष्ट्रवादीची युती होऊन काँग्रेसचा पराभव करण्याची त्यांची रणनीती असल्याचे चित्र सध्या दिसून येत
आहे. यामुळे देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या निवडणुकीची रंगत वाढत चालली असून, आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच सर्व पक्षांची भूमिका स्पष्ट होऊन खऱ्या अर्थाने निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे.
मनसे पक्षाने देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एकही उमेदवार उभा केला नसल्याने त्यांचा पाठिंंबा कोणाला मिळतो याचीही उत्सुकता लागून राहिली असली, तरी मनसे सध्याच्या वातावरणात तरी काँग्रेसच्या बाजूने उभे राहणार आहे..


भाजपविरोधात काँग्रेसमध्ये थेट लढत
देवगड-जामसंडे नगरपंचायतीची घोषणा झाल्यापासून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यामध्ये आमदार नीतेश राणे हे आघाडीवर आहेत. जामसंडे भाग हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच जामसंडे-खाकशी भागामध्ये आमदार नीतेश राणे यांनी कित्येक वर्षांपासून भेडसावणारा पाणी प्रश्न सोडविल्याने ही काँग्रेसच्यादृष्टीने जमेची बाजू ठरणार आहे. यामुळे काही प्रभागांमध्ये खरी लढत ही भाजप विरुद्ध काँग्रेस अशी होणार आहे.
शिवसेनेचा एक गट भाजपच्या विरोधात
शिवसेनेमध्ये एक गट हा पूर्णत: भाजपच्या विरोधात आहे. त्यांना सेना-भाजपची युती नको आहे. त्यामुळे हा गट आमदार नीतेश राणे आपल्याकडे वळविण्यासाठीही प्रयत्न करत आहेत. याचा फायदा काँग्रेसला निवडणुकीमध्ये होऊ शकतो. तर राष्ट्रवादीचे देवगड- जामसंडे भागातील कार्यकर्ते हे आघाडी होण्यासाठी उत्सुक होते. मात्र, राष्ट्रवादीचे नंदूशेठ घाटे यांचे आघाडी करायची नसल्याचे सुरुवातीपासूनच मत असल्याने कार्यकर्त्यांचे त्यांच्यापुढे काहीच चालेनासे झाले आहे. यामुळे हे राष्ट्रवादीचे नाराज कार्यकर्तेही छुप्या पद्धतीने काँग्रेसला सहकार्य करू शकतात.

Web Title: The possibility of Mahayuti against the Congress in Devgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.