शिवसेनेत खांदेपालट होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2018 03:23 PM2018-06-15T15:23:36+5:302018-06-15T15:23:36+5:30
मी मंत्रिपदावर असेन किंवा नसेन, पण जनतेचे प्रश्न हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, असे सूचक वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
सिंधुदुर्ग - मी मंत्रिपदावर असेन किंवा नसेन, पण जनतेचे प्रश्न हेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत, असे सूचक वक्तव्य राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आगामी काळात शिवसेनेत मोठे फेरबदल पाहायला मिळतील. त्या पार्श्वभूमीवर केसरकरांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. मंत्री केसरकर हे गुरूवारी एक दिवसाच्या सावंतवाडी दौ-यावर होते. यावेळी त्यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. त्यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या अनेक प्रश्नांना हात घातला. मात्र कोकण पदवीधर मतदार संघाची सध्या आचारसंहिता आहे.
त्यामुळे मी कुठच्या विकासाच्या प्रश्नावर बोलणार नाही, असे सांगत जिल्ह्याचा विकास व्हावा हीच माझी अपेक्षा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. चांदा ते बांदा योजना कशी राबविली जाईल, तसेच सिंधुदुर्गमध्ये कोट्यवधीचा निधी आला तो कसा मागे गेला यावर मंत्री केसरकर यांनी प्रकाश टाकला. आपण जे अधिकारी जिल्ह्याच्या विकासात लक्ष घालत नाहीत त्यांना बदलण्याचे धोरण आखल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्था सुधारावी म्हणून प्रयत्न सुरू आहेत. यात येणारे अडथळे अशा अनेक गोष्टींचा उहापोह यावेळी मंत्री केसरकर यांनी केला आहे.