पद असो अथवा नसो ,जनसेवेचे व्रत कधीही सोडणार नाही : संदेश पारकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 11:04 AM2021-07-16T11:04:26+5:302021-07-16T11:06:47+5:30
Sandeshparkar Sindhudurg : माझ्या ३५ वर्षांच्या राजकीय कारकीर्दमध्ये अनेक चढ-उत्तार पाहिले. त्याचप्रमाणे अनेक आव्हानांचा सामना करताना दहशतही अनुभवली. पण कधीही मनाने खचलो नाही. तर जनतेच्या हितासाठी व जिल्ह्याच्या विकासाकरिता अविरतपणे काम करत राहिलो.त्यामुळे विरोधकांना पुरून उरलो. पद असो अथवा नसो, जनसेवेचे घेतलेले व्रत कधीही सोडणार नाही.असे प्रतिपादन शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी केले.
कणकवली: माझ्या ३५ वर्षांच्या राजकीय कारकीर्दमध्ये अनेक चढ-उत्तार पाहिले. त्याचप्रमाणे अनेक आव्हानांचा सामना करताना दहशतही अनुभवली. पण कधीही मनाने खचलो नाही. तर जनतेच्या हितासाठी व जिल्ह्याच्या विकासाकरिता अविरतपणे काम करत राहिलो.त्यामुळे विरोधकांना पुरून उरलो. पद असो अथवा नसो, जनसेवेचे घेतलेले व्रत कधीही सोडणार नाही.असे प्रतिपादन शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी केले.
कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे आयोजित कोरोना योद्धा सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख गितेश कडू, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत,सुशांत नाईक,कन्हैया पारकर,नीलम सावंत,संदेश सावंत- पटेल,अवधूत मालणकर , राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस रुपेश जाधव आदी उपस्थित होते.
संदेश पारकर म्हणाले, कॉंग्रेस विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदापासून माझी राजकीय इनिंग सुरू झाली. जिल्ह्यातील राजकीय दहशतवादाविरोधात लढा दिल्यामुळे माझी राज्यभर ओळख निर्माण झाली. राजकीय प्रवासात मी काही चुकीचे निर्णय घेतले.त्यातून माझे मोठे नुकसान झाले. हे मला मान्य आहे. पण मी ज्या पक्षात असतो त्या पक्षाचे काम प्रामाणिपणे करतो. समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून आपण सामाजिक कार्य करीत आहे. त्यामुळे जनतेशी माझी नाळ जुळली आहे.
जनतेचे माझ्यावर असलेले प्रेम व आशीर्वाद हे माझ्यासाठी सर्वोच्च पद आहे. आतापर्यंत अनेक आव्हाने पेलली, दहशत, भीतीही अनुभवली, काही चुकीच्या निर्णयांमुळे मित्रही गमावले ते दुसर्या पक्षात जाऊन मोठे झाले. पण त्यांच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही कटुता नाही. त्यांची उत्तरोतर प्रगती होत राहो,अशा शुभेच्छाही पारकर यांनी यावेळी दिल्या.