टपाल खाते पालटले
By admin | Published: October 9, 2015 01:10 AM2015-10-09T01:10:01+5:302015-10-09T01:11:40+5:30
जागतिक टपाल दिन विशेष
अरूण आडिवरेकर - रत्नागिरी दळणवळणासाठी महत्त्वाचे साधन म्हणजे ‘पोस्ट’. ब्रिटिश काळात १८५४ साली सुरू झालेली ही सेवा आजही अविरतपणे सुरू आहे. त्याकाळी सर्वसामान्यांचे पोस्टाशी जुळलेले नाते आजही तसेच टिकून आहे. आधुनिकतेच्या युगात सुमारे १६० वर्षे हे नाते जपले जात आहे, याचे विशेष. सुखदु:खाच्या क्षणांचा साक्षीदार बनलेल्या पोस्ट खात्याला ‘कार्पोरेट लूक’ आला आहे. सोशल मीडियाच्या काळात आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी पोस्टाने हा ‘कार्पोरेट लूक’ स्वीकारला आहे. हे करत असताना नवनवीन योजना राबवून त्या जनतेपर्यंत नेण्याचे काम पोस्टाला करावे लागले. आजच्या युगात पोस्टाचे रूपडेच पालटून गेल्याचे दिसून येईल.
१ आॅक्टोबर १८५४ साली भारतात स्थापन झालेल्या पोस्ट खात्याला २००४ साली १५० वर्षे पूर्ण झाली. सुरुवातीला पत्रांची देवाणघेवाण करणे एवढाच व्यावसायिक दृष्टीकोन डोळ््यासमोर ठेवून काम सुरू होते. त्याकाळात रेल्वे आणि टपाल या दोनच सेवा सुरू करण्यात आल्या होत्या. १८७४ साली स्वित्झर्लंडची राजधानी बर्न येथे १० आॅक्टोबर १८७४ मध्ये जागतिक स्तरावर पोस्टाची स्थापना झाली. त्यानंतर पोस्टाचा प्रवास जलदगतीने जगभर होऊ लागला. १९६९ साली टोकियोमध्ये बैठक झाली, त्यात जागतिक पोस्ट दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्रिटिश काळापासून तार ही अत्यावश्यक सेवा सुरू झाली. तार आली की, मनात अशुभाची पाल चुकचुकत असे, पण ग्रामीण भागातून तार केली जायची ती चाकरमान्याला गावी यायला सुटी मिळावी म्हणून. ही तार सेवा रत्नागिरीत १९६० साली सुरू झाली. त्यावेळी रत्नागिरी आणि सिंंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे संयुक्त होते. तारसेवा सुरू झाल्यानंतर त्याचा उपयोग कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या रजेसाठी अत्यंत महत्त्वाचे होता. कोकणातील बहुसंख्य लोक मुंबईत असल्याने त्यांना गावी येण्यासाठी गावाहून आई-वडील आदी नातलगांच्या आजारपणाच्या तारेमुळे चटकन रजा मिळत असे. सैनिकांना तर मध्ये घरी येण्याचा तार हा मोठा आधार ठरत असे.
रत्नागिरी - सिंधुदुर्ग आणि अलिबाग अशी विभागीय कार्यालये १९३८ साली कार्यरत झाली. १८६५ साली रत्नागिरी येथील गोगटे - जोगळेकर कॉलेजजवळ पोस्टाची इमारत बांधण्यात आली. याठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी क्वॉटर्सदेखील आहेत. ब्रिटिशकालीन ही इमारत आजही आपल्या मजबूत कामाची प्रचिती देत आहे, तर क्षेत्रीय कार्यालय पणजी येथे आहे. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर आणि गोवा या पाच विभागीय कार्यालयांचा समावेश आहे.
सन १९८५ नंतर तंत्रज्ञानाने अनेक सुविधा आल्या. त्यानंतर तर मोबाईल सेवा आल्याने पूर्वीच्या सेवा ‘आऊटडेटेड’ ठरू लागल्या. तत्काळ सेवा म्हणून मेल, फॅक्स सुविधा अस्तित्त्वात आली. कालपरत्वे संदेशवहनाची अनेक अत्याधुनिक साधने आल्याने पोस्टाचे अस्तित्व धोक्यात आले. सोशल मीडियाच्या जमान्यात तर पोस्टकार्ड आणि अंतर्देशीय पत्र कुठे निघून गेली, याचा पत्ताच लागत नाही. तरीदेखील टपाल खाते आपले अस्तित्व टिकवून आहे ते केवळ ‘कार्पोरेट लूक’ मुळे. २००५ साली ‘बिझनेस डेव्हलपमेंट’ची निर्मिती करण्यात आली आणि टपाल खात्याने कात टाकली. भेटकार्ड विकणे, इमामीचे प्रॉडक्ट वाटणे, यांसारखी सेवा देत टपाल खात्याने आपले स्थान टिकवून ठेवले आहे. आता त्यामध्ये बदल होत जाऊन टपाल खात्याने नवनवीन योजनांच्या सहाय्याने जनतेशी नाते अविरतपणे टिकवून ठेवले आहे. आधुनिकतेच्या काळात टपाल खात्यानेही कात टाकली आहे, हे नक्की.
टपाल खात्याने आपल्या कार्यपद्धतीत अमुलाग्र बदल केला आहे. जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालये एकमेकांशी इंटरनेटने जोडण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत १७ कार्यालयांचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित ५३ कार्यालयांचे काम सुरू आहे. डिसेंबरपर्यंत ‘कोअर बँकिंग’ सेवा पूर्ण होईल.
- बी. आर. सुतार, डाकघर अधीक्षक, रत्नागिरी विभागीय कार्यालय.
ग्रामीण भागात महावितरणची वीजबिलदेखील स्वीकारण्याचे काम टपाल खात्याकडून सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या वेळेची बचत होते. तसेच त्यांना हेलपाटे मारावे लागत नाहीत.
टपाल खात्यातील अन्य सुविधांमध्ये स्पीड पोस्टचा आजही मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. गतवर्षी १ लाख ५३ हजार इतकी स्पीड पोस्टने टपाल पाठविण्यात आली. त्यातून ६५ लाख इतके उत्पन्न मिळाले आहे. टपाल खात्याने फ्री पिकअप ही सेवादेखील सुरू केली आहे. कंपनी अथवा कार्यालयाशी करार करून त्यांचे टपाल स्वत: जाऊन घेतले जाते आणि पाठविले जाते. ‘बुक नाऊ पे लॅटर’ या उपक्रमातून ही सेवा दिली जात आहे.