एमबीबीएस झालेल्यांसाठी पदव्युत्तर पदविका
By admin | Published: August 5, 2015 12:18 AM2015-08-05T00:18:18+5:302015-08-05T00:18:18+5:30
२० रुग्णालयांना लाभ : अभ्यासक्रम जिल्हा रुग्णालयांमध्येच
प्रकाश वराडकर- रत्नागिरी -राज्यभरात जिल्हा रुग्णालये व अन्य शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टर्सच्या अनेक जागा रिक्त आहेत. ही कमतरता लक्षात घेऊन वैद्यकीय महाविद्यालय नसलेल्या प्रत्येक जिल्हा रुग्णालयात राज्य शासनामार्फत कॉलेज आॅफ फिजिशियन्स अॅण्ड सर्जन (पीसीएस) योजनेंतर्गत एम.बी.बी.एस. केलेल्यांसाठी पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम येत्या सप्टेंबर किंवा आॅक्टोबर २०१५मध्ये सुरू केला जाणार आहे. रत्नागिरीसह राज्यातील २० जिल्हा रुग्णालयांना याचा लाभ होणार आहे. राज्यभरातील ३४ पैकी १४ जिल्हा रुग्णालयांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये आहेत. कोल्हापूर, सांगली, पुणे, औरंगाबाद, लातूर, नागपूर, अमरावती, नांदेड, धुळे आदी जिल्हा रुग्णालयांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये आहेत. मात्र, उर्वरित २० जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालये नाहीत. त्यातील अनेक जिल्हा रुग्णालयांत वैद्यकीय महाविद्यालये प्रस्तावित आहेत. परंतु अद्याप त्यांचे प्रस्ताव पुढे सरकलेले नाहीत. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातही वैद्यकीय महाविद्यालय होणार असल्याच्या राजकीय घोषणा झाल्या. त्यासाठी पाहणीही झाली. परंतु अद्यापही याबाबत कार्यवाही झाली नाही.
रत्नागिरी जिल्हा रुग्णालय तसेच तालुकापातळीवर असलेली रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये यामध्ये अनेक प्रथम श्रेणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. शासकीय सेवेत येण्यास डॉक्टर्स तयार होत नाहीत. ग्रामीण भागात येण्याचीही त्यांची तयारी नसते. याचा फटका रत्नागिरीसह अनेक जिल्हा रुग्णालयांना काही वर्षात बसला आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. परिणामी रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर एम.बी.बी. एस. पदवी घेतलेल्यांसाठी रुग्णालयांमध्ये शासनाने पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात या अभ्यासक्रमासाठी जे तीन पदव्युत्तर पदविका घेतलेले वैद्यकीय अधिकारी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत, त्यामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक व बालरोगतज्ज्ञ डॉ. आरसुळकर, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पी. एस. चव्हाण, भूलतज्ज्ञ डॉ. पी. पी. काजवे यांचा समावेश आहे.
परीक्षा शासकीय निकषांनुसारच
एम.बी.बी.एस. होऊन ज्यांना पदव्युत्तर पदविका सुविधा उपलब्ध नाही, अशा एम.बी.बी.एस. पदवीधारकांना जिल्हा रुग्णालयातील या अभ्यासक्रमास प्रवेश घेता येईल. या अभ्यासक्रमाची शासकीय निर्देशानुसार शासनस्तरावर परीक्षा होणार आहे. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या डॉक्टर्सना काही काळ शासकीय सेवेत घेतले जाणार आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयांनाही प्रशिक्षित डॉक्टर्स उपलब्ध होतील, असा यामागील उद्देश आहे.
या अभ्यासक्रमासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात तीन पदव्युुत्तर पदविका घेतलेले व दहा वर्षांचा अनुभव असलेले वैद्यकीय अधिकारी शिक्षक म्हणून काम पाहणार आहेत, तर पाच वर्षांचा अनुभव असलेले पदव्युत्तर पदविका घेतलेले तीन उपशिक्षकही कार्यरत होणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वीच पाठविण्यात आला होता. त्यातील काही त्रुटींची पूर्तता करून हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
-डॉ. बाळासाहेब आरसूळकर, जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी जिल्हा रुग्णालय.