लेखणीबंद आंदोलन स्थगित
By admin | Published: July 21, 2016 11:11 PM2016-07-21T23:11:01+5:302016-07-21T23:30:39+5:30
पंकजा मुंडे यांचे आश्वासन : संघटनेची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणार
सिंधुदुर्गनगरी : लिपिक कर्मचाऱ्यांचे गेले सात दिवस सुरू असलेले लेखणी बंद आंदोलन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या आश्वासनानंतर तीन महिन्यांसाठी स्थगित करण्यात आल्याची माहिती लिपिक कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अमित तेंडोलकर यांनी गुरूवारी रात्री उशिरा दिली.
गेले सात दिवस सुरू असणाऱ्या आंदोलनाला शासनाने बेदखल केले होते. त्यामुळे गुरूवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची तीव्रता वाढवणार असल्याचे सांगितले. यानुसार त्यांनी आता आर या पार अशी भूमिका घेत ठामपणे आंदोलन पुढे सुरूच ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेतला होता. दरम्यान, संपूर्ण राज्यभर चालु असणाऱ्या संपामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परीषद या सर्वच ठिकाणी कामे रखडलेली आहेत. याचा त्रास नागरिकांना होत आहे. याबाबत शासनाने निवेदन करुन संप मागे घेण्याबाबत कार्यवाही करावी. अशी मागणी पॉर्इंट आॅफ इन्फॉर्मेशनद्वारे विधानसभेत आमदार वैभव नाईक यांनी केली. या मागणीची तत्काळ दखल घेऊन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सदर लिपिक कर्मचारी यांच्या शिष्टमंडळाची बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन
दिले. (प्रतिनिधी)
स्थगितीचा निर्णय तीन महिन्यांसाठी
त्यानुसार ग्रामविकासमंत्री मुंडे यांनी संघटनेशी बैठक घेतली आणि पहिल्या सात मागण्या तीन महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. व उर्वरित त्यानंतर पूर्ण करण्याचे अभिवचन दिले. त्यानुसार कर्मचारी संघटनेने आपले आंदोलन तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा निर्णय रात्री उशिरा घेतल्याची माहिती अमित तेंडोलकर यांनी ‘लोकमत’ला दिली.