मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचा वैताग, ट्रक चालक-मालक संघटनांचा चक्काजामचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 03:06 PM2017-11-03T15:06:00+5:302017-11-03T15:06:47+5:30
मुंबई- गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. महामार्गावरील रस्ते खड्डेमय झाल्यानं गुरूवारी जिल्हा ट्रक चालक-मालक संघटनेने रस्त्यावर उतरत आंदोलन केले
कुडाळ : मुंबई- गोवा महामार्गाची दुरवस्था झाली आहे. महामार्गावरील रस्ते खड्डेमय झाल्यानं गुरूवारी जिल्हा ट्रक चालक-मालक संघटनेने रस्त्यावर उतरत आंदोलन केले. यावेळी शासनाचा निषेध करण्यात आला. तसेच येत्या आठ दिवसात बांदा ते वडखळपर्यंतचा खड्डेमय रस्ता सुस्थितीत न झाल्यास चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा ठिकठिकाणी पडणा-या भल्यामोठ्या खड्ड्यांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी सातत्याने आवाज उठवूनही शासन निद्रावस्थेत आहे. सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी फक्त घोषणाबाजी केली. आता अवेळी पडणारा पाऊस उलटून आठदहा दिवस झाले तरी रस्त्याच्या दुरूस्तीसाठी पावले उचलली दिसत नाहीत. अखेर गुरूवारी सकाळी सिंधुदुर्ग जिल्हा ट्रक मालक संघटना, राज्यट्रक महासंघ, रिक्षा युनियन, टेम्पो युनियन रस्त्यावर उतरले. पावशी भंगसाळ नदीनजिक लोकशाही पद्धतीने माजी आमदार पुष्पसेन सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. यावेळी जिल्हा ट्रक मालक संघटनेचे आनंद वालावलकर, राजन बोभाटे, गोविंद वाटवे, बाबा तेली, बाबी कुंभार, हनुमंत तोटकेकर, मनोज वालावलकर, बाळा भोगटे, शिवाजी घोगळे, संघटनेचे पदाधिकारी, रिक्षा युनियनचे राजन राऊळ, अविनाश पाटील, राजन घाडी, डंपर चालक मालक संघटनेचे नितीन शिरसाट, समीर दळवी, वैभव देसाई, मंदार बांदेकर, संदेश कुडाळकर आदींसह प्रवासी, पादचारीवर्ग उपस्थित होता.
यावेळी शासनविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. संघटनेने शांततेच्या मार्गाने रास्ता रोको न करता एकेरी वाहतूक सुरू ठेऊन लोकशाही मार्गाने आंदोलन केले. माजी आमदार पुष्पसेन सावंत म्हणाले, गेले काही महिने खड्डेमय रस्त्यांमुळे सर्वांनाच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शासन पातळीवर यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही. शासन हा रस्ता चौपदरीकरण करण्यामागे गुंतला आहे. चौपदरीकरण होईपर्यंत अशा खड्ड्यांतून भविष्यात अनेकांना गंभीर घटनांना सामोरे जावे लागणार आहे. आता पावसाळा संपला तरी निद्रीस्थ शासन जागे होत नाही. आतापर्यंत रस्त्यासाठी विविध संघटनांनी आंदोलने केली. आता ट्रक मालक चालक रस्त्यावर उतरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रस्त्याचा सेल्फी काढून शासनाच्या कार्यपद्धतीबाबत रोष व्यक्त केला. आता डिसेंबरपर्यंत रस्त्याची डागडूजी करण्याची डेटलाईन देतात. आता तुम्ही पोकळ आश्वासन देणे थांबवा व रस्ता तात्काळ सुस्थितीत करावा, अशी मागणी त्यांनी केली. गेले कित्येक महिने शासन हे जनता, प्रवासी यांच्याशी खेळत आहे. पोकळ आश्वासनापलीकडे काही करत नाही. आता आम्ही शांततेच्या मार्गाने रस्ता दुरूस्तीसाठी लक्ष वेधले. येत्या आठ दिवसात रस्ता सुस्थितीत न केल्यास बांदा ते वडखळपर्यंत चक्काजाम करण्याचा इशारा मनोज वालावलकर, शिवाजी घोगळे यांनी दिला.
खड्ड्यांचा संदेश गुजरातला द्या -आंदोलनकर्ते
यावेळी रस्त्यावरून जाणा-या सर्व वाहन चालकांना संघटनेच्यावतीने गुलाबपुष्प देऊन प्रवास सुखाचा व्हावा अशा शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी गुजरात पासिंगचा टेम्पो जात होता. यावेळी या टेम्पो चालकाला येथील खड्ड्यांचा संदेश तुमच्या गुजरातला देण्याचा सल्ला संघटनेच्या पदाधिका-यांनी दिला.