सोनाली पालव यांचे पोतराज शिल्पकृती राष्ट्रीय कलाप्रदर्शनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 03:59 PM2020-03-19T15:59:09+5:302020-03-19T16:17:43+5:30
केंद्र सरकारच्या ललित कला अकादमीतर्फे आयोजित मानाच्या राष्ट्रीय कलाप्रदर्शनासाठी शिल्पकार सोनाली प्रमोद पालव यांनी साकारलेल्या पोतराज या शिल्पकृतीची निवड झाली आहे. या प्रदर्शनात देशभरातून निवडक कलाकारांना त्यांच्यातील कलाविष्कार मांडण्याची संधी मिळते.
कणकवली : केंद्र सरकारच्या ललित कला अकादमीतर्फे आयोजित मानाच्या राष्ट्रीय कलाप्रदर्शनासाठी शिल्पकार सोनाली प्रमोद पालव यांनी साकारलेल्या पोतराज या शिल्पकृतीची निवड झाली आहे. या प्रदर्शनात देशभरातून निवडक कलाकारांना त्यांच्यातील कलाविष्कार मांडण्याची संधी मिळते.
या प्रदर्शनासाठी देशभरातून सुमारे ३००० कलाकारांनी आपल्या कलाकृती पाठविलेल्या असून त्यातून २८३ कलाकृतींची परीक्षकांनी निवड केली आहे. नवी दिल्ली येथील रवींद्र भवन कलादालनात या कलाकृती जगभरातील कलाप्रेमींसाठी प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
लहानपणापासून उपजत कलागुण असणाऱ्या सोनाली यांनी सर जे. जे. स्कूल आॅफ आर्ट, मुंबई येथून कलेचे शिक्षण घेतले. त्यांनी तयार केलेल्या अनेक तैलचित्र आणि शिल्पांमधून त्यांची कला विविधांगी बहरत गेली. पुढे राज्यस्तरीय व युनिव्हर्सिटीच्या लहान-मोठ्या पुरस्कारांनी त्या नेहमीच कलाक्षेत्रात कार्यरत राहिल्या.
२००९ व २०१० मध्ये मुंबई युनिव्हर्सिटीच्या आंतरमहाविद्यालयीन युथ फेस्टिव्हलमध्ये रांगोळी स्पर्धेतून सलग दोन वर्षे सुवर्णपदकांसह विजेत्या ठरल्या. २०१५ साली सर जे. जे. स्कूल आॅफ आर्टच्या पंडित दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार व पुढे संस्थेच्या बी. व्ही. तालीम पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.
चित्रकला व शिल्पकला या माध्यमातून आपल्या देशाची संस्कृती व कला, परंपरा, इतिहास, जीवनशैली, सामाजिक जाणीव यांचा सुरेख संगम सोनाली यांच्या कलाकृतीतून पहायला मिळतो.
पोतराज या शिल्पकृतीने प्रदर्शनाला भेट देणाऱ्या दिग्गज आणि कलारसिकांना आकर्षित केले आहे. सोनाली यांच्या कौतुकास्पद कार्याचा अनेक मान्यवरांकडून गौरव करण्यात येत आहे. या निवडीमुळे सोनाली यांच्या कलेचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान झाला आहे.