आर्थिक सुबत्तेसाठी कुक्कुटपालन करा
By admin | Published: April 13, 2016 08:59 PM2016-04-13T20:59:00+5:302016-04-13T23:34:25+5:30
नारायण राणे यांचे आवाहन : ओसरगाव येथे विशेष कार्यशाळा
कणकवली : जिद्द आणि मेहनत ठेवून व्यवसाय केल्यास नफा मिळविण्यामध्ये मर्यादा नसतात. कुक्कुटपालनाच्या व्यवसायासाठी जिल्हा बँक नव्या दोन कर्ज योजना सुरू करीत आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेऊन आर्थिक सुबत्तेसाठी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले.
ओसरगाव येथील सिंधुदुर्ग महिला भवन येथे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व व्यंकटेश्वर हॅचरीस प्रा.लि. यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या कुक्कुटपालन चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विंकीस्या कंपनीचे मुख्य व्यवस्थापक डॉ. पी. जी. पेटगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. पठाण, डॉ. चंदे, शिक्षण सभापती आत्माराम पालेकर, महिला बालकल्याण सभापती रत्नप्रभा वळंजू, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, आदी उपस्थित होते.
नारायण राणे म्हणाले, सिंधुदुर्गात तरुण चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहेत; पण नोकऱ्या कुठे आहेत? ज्या मुलांना मुंबई-पुण्यात नोकऱ्या मिळतात, त्यांना १५ हजारांपेक्षा जास्त पगार मिळत नाही. म्हणून तरुणांनी व्यवसायाकडे वळण्याची गरज आहे. मी राजकारण करतानाच व्यवसाय देखील करत आहे. वयाच्या १४ व्या वर्षांपासून मी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब जनतेने जिल्हा बँकेच्या माध्यमातून कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी पुढाकार घ्यावा. व्यवसाय करताना पिकअप शेड लागेल त्यासाठी जिल्हा बँक कर्ज देईल. आणि विंकीस्या या कंपनीच्या माध्यमातून खाद्य, औषधे देण्यात येतील. वाढलेल्या कोंबड्या त्याच कंपनीला द्याव्या लागतील. त्यातून प्रत्येक कुटुंबात आर्थिक सुबत्ता येईल. एवढी ताकद या व्यवसायात असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. डॉ. पी. जी. पेटगावकर म्हणाले, ९० हजार कोटींचा उद्योग कुक्कुटपालन या व्यवसायातून होत आहे. २०२० पर्यंत सव्वा कोटीची उलाढाल कुक्कुटपालनातून होईल. या व्यवसायात यश-अपयशाच्या दोन बाजू असतात. पण अपयशाची बाजू जास्त हायलाईट केल्यामुळे व्यवसायापासून तरुण परावृत्त होत आहेत. चांगल्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन कुक्कुटपालन व्यवसायात उतरल्यास अपयश येणार नाही. माणसाच्या शरीराला आवश्यक असलेल्या मांसाहाराची गरज पाहता चिकनची मागणी वाढतच राहणार आहे. या व्यवसायात शिक्षणाची अट नाही. नफ्याच्या प्रमाणाचा विचार करता कुक्कुटपालनासारखा दुसरा व्यवसाय नाही, असेही ते म्हणाले. सतीश सावंत म्हणाले, नारायण राणे यांच्या संकल्पनेतील दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कटपालनसारखा व्यवसाय चांगला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या माध्यमातून दुग्ध, शेळी-मेंढी, कुक्कुटपालन यासारख्या व्यवसायांना बळ देण्यासाठी विविध कर्ज योजना जिल्हा बँकेने आणल्या आहेत. उपस्थितांचे आभार अनिरुद्ध देसाई यांनी मानले. विंकीस्या कंपनीच्या माध्यमातून लवकरच जिल्ह्यात मार्गदर्शन शिबिर घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)