वीज ग्राहकांना एलईडी बल्ब
By admin | Published: June 25, 2015 11:25 PM2015-06-25T23:25:15+5:302015-06-25T23:25:15+5:30
महावितरण कंपनी : चार लाख सोळा हजार लोकांना लाभ
रत्नागिरी : विजेची बचत करता यावी यासाठी राज्यातील १ कोटी ७५ लाख घरगुती ग्राहकांना एलईडी बल्ब वाटप योजनेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ४ लाख १६ हजार ८८६ घरगुती ग्राहकांना या एलईडी बल्बचा लाभ मिळणार आहे.एलईडी दिव्यांमुळे राज्याच्या १३ दशलक्ष युनिटस् वार्षिक विजेची बचत होणार आहे. कमाल मागणीच्या काळात ५०० मेगावॅट वीजेची मागणी कमी होण्यास मदत होईल. तसेच ग्राहकांची एका वर्षात प्रती बल्ब १८० रुपयांची वीजबिलामध्ये बचत होणार आहे. केंद्र सरकारने वीज बचतीसाठी घरगुती ग्राहकांना एलईडी दिवे वाटप योजना जाहीर केली आहे. या योजनेतील घरगुती ग्राहकांना प्रत्येकी ७ वॅट क्षमतेचे २ ते ४ बल्ब देण्यात येणार आहेत.
हे बल्ब १०० रुपये रोखीने किंवा १०५ रुपये दराने मासिक योजनेच्या हप्त्याने घेता येतील. या योजनेमुळे बिलातून शून्य व्याजाने रक्कम वसूल केल्यामुळे ग्राहकांचा आर्थिक भार कमी होईल. शिवाय या योजनेचा विजेच्या दरावर किंंवा महावितरणवर कोणताही आर्थिक बोजा येणार नाही.
तीन वर्षामध्ये मोफत बल्ब बदलण्याची गॅरंटी राहणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकाला एसएमएस, ईमेल किंवा प्रत्यक्ष कक्षावर भेटून बल्बची नोंदणी करावी लागेल. योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणचे शाखा कार्यालय, बिल भरणा केंद्र व इतर ठिकाणी बल्ब वाटप कक्ष उघडण्यात येणार आहे. ईईएसएल कंपनीतर्फे घरपोच सेवेची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधींच्या सहभागाने बल्ब वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
राज्याच्या १३ दशलक्ष युनिटस् वार्षिक वीजेची बचत होणार.
कमाल मागणीच्या काळात ५०० मेगावॅट वीजेची मागणी कमी होण्यास मदत.
ग्राहकांची एका वर्षात प्रती बल्ब १८० रुपयांची बचत.
बल्ब १०० रुपये रोखीने किंवा मासिक योजनेच्या हप्त्याने घेता येणार.