सिंधुदुर्गचा विकास करण्यात सत्ताधारी अपयशी : परशुराम उपरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 04:39 PM2018-05-21T16:39:55+5:302018-05-21T16:39:55+5:30
सिंधुदुर्गचा विकास करण्यात हे सत्ताधारी अपयशी ठरले आहेत हे सिद्ध होत आहे, अशी टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे केली.
कणकवली : शिवसेना तसेच भाजप या सत्ताधारी पक्षातील आमदार व पदाधिकाऱ्यांनी जनतेला दिलेली आश्वासने फोल ठरली आहेत. आतापर्यंत त्यांनी केलेल्या घोषणांचा पाठपुरावा करण्यातही ते कमी पडले असून त्याचेच उदाहरण म्हणजे आयुष रुग्णालयासाठी सिंधुदुर्गातून प्रस्तावच पाठविण्यात आलेला नाही. त्यामुळे सिंधुदुर्गचा विकास करण्यात हे सत्ताधारी अपयशी ठरले आहेत हे सिद्ध होत आहे, अशी टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे केली.
कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, आडाळी येथील एमआयडीसी तसेच आयुष रुग्णालय याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, राजन तेली, अतुल काळसेकर यांनी अनेकवेळा घोषणा केल्या आहेत. त्याला अनुसरुन पाठपुरावा करणे आवश्यक होते. तो करण्यात आलेला नाही. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सिंधुदुर्गचा आयुष रुग्णालयाच्या बाबतीतील प्रकल्प केंद्र शासनाकडे गेलेलाच नाही, असे सांगितले आहे.
दोडामार्ग येथे जनतेला आरोग्य सेवेसाठी आक्रोश आंदोलन करावे लागले. यावेळी गोवा येथील बांबुळीतील रुग्णालयाला सिंधुदुर्गातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अडीच कोटी रुपये देण्यात येतील अशी घोषणा पालकमंत्र्यांनी केली होती. ती फसवीच ठरली आहे. त्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.
आता पुन्हा एकदा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे जनतेला भुलविण्यासाठी या सत्ताधाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात घोषणा केल्या जातील. त्यापासून जनतेने सावध रहावे. मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच केलेली ७५००० पदांच्या भरती बाबतची घोषणाही फसवीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घोषणेला बळी पडून नोकरी स्वीकारणारे त्यांची नोकरी गेल्यावर अधांतरीच राहणार आहेत.
या सर्व घोळात नोकरीसाठी असलेली त्यांची वयोमर्यादा संपल्यावर ते बरबाद होणार आहेत. त्यामुळे मनसेच्यावतीने यापुढील काळात शासनाच्या फसव्या घोषणा जनतेसमोर आणण्यात येतील. तसेच कोणत्याही परिस्थितीत जनतेची फसवणूक होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही उपरकर यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री अपयशी
जिल्ह्याचे पालकमंत्री अपयशी ठरले आहेत. ते निष्क्रिय असून जिल्ह्यासाठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल बांधणार असे त्यांनी घोषित केले होते. त्याचे काय झाले? जिल्ह्यातील जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे जनता त्रस्त आहे. त्यांना जिल्ह्यातील जनतेबद्दल काही देणे घेणे नाही. अशी स्थिती आहे. असे उपरकर म्हणाले.