प्रभुगावकर, वळंजू, पालयेकर बिनविरोध
By Admin | Published: January 25, 2016 11:12 PM2016-01-25T23:12:30+5:302016-01-25T23:12:30+5:30
सतीश सावंत यांची माहिती : जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापतीपदांची निवड
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या २५ व्या अध्यक्षपदी संग्राम नारायण प्रभुगावकर यांची निवड झाली. महिला व बालविकास सभापतीपदी रत्नप्रभा वळंजू तर विषय समिती सभापतीपदी दिलीप रावराणे आणि आत्माराम पालयेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपाध्यक्षपदाचा निर्णय येत्या दोन दिवसात काँग्रेस नेते नारायण राणे घेतील अशी माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.
जिल्हा परिषद अध्यक्ष, विषय समिती सभापतींच्या रिक्त झालेल्या पदांसाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली.
या सर्व पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने या निवडीसाठी झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत ही बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी रविंद्र सावळकर यांनी काम पाहिले.
या निवडीनंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई, अशोक सावंत, दीपलक्ष्मी पडते आदींनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी अनेकांची नावे चर्चेत असल्यामुळे उत्सुकता ताणली होती. नव्या टिमची यादी काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी पक्षाच्या बैठकीत जाहीर करत लागलीच नामनिर्देशनपत्राचे सोपस्कार पूर्ण केले. त्यानंतर दुपारी जिल्हा परिषद सभेचे कामकाज पूर्ण केले. यावेळी विरोधी पक्षाचे राजन म्हापसेकर, जान्हवी सावंत व काँग्रेसचे सर्व जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर काँग्रेसमध्ये दाखल झालेले प्रकाश कवठणकर, निकिता जाधव, पंढरी राऊळ, समीर नाईक हे सदस्य सुरुवातीला अध्यक्षांसह सभापतीपदांसाठीच्या अर्ज भरणाऱ्यांची नावे जाहीर होईपर्यंत जिल्हा परिषदेमध्ये उपस्थित होते. मात्र त्यानंतर हे सर्व जिल्हा परिषदेमधून निघून गेल्याने त्याच्यातील काही इच्छुकांना या पदांमध्ये सहभाग मिळाला नसल्याने ते नाराज होऊन गेले असल्याची चर्चा जिल्हा परिषद भवनात सुरु होती. मात्र याबाबत काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांना विचारले असता हे सर्व जण बैठकीस उपस्थित होते. मात्र त्यांची काही कामे असल्याने ते परवानगी घेऊन गेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
अखेर लॉटरी लागली : मांडलेले प्रश्न सोडवा
संग्राम प्रभुगांवकर हे माजी राज्यमंत्री बापूसाहेब प्रभुगांवकर यांचे पुतणे होत. मसुरे येथील प्रभुगांवकर हे सरदार घराणे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून संग्राम प्रभुगांवकर यांनी सामाजिक कार्यात कामकाज सुरु केले. मसुरे पंचक्रोशीमध्ये विविध संस्थांवर त्यांनी काम केले. सन २००५ ते २०१० या कालावधीत ते मसुरे सरपंच म्हणून कार्यरत होते. २०१३ मध्ये प्रथमच ते काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. अध्यक्षपद हे खुल्या वर्गासाठी राखीव झाल्यावर गेली ३ वर्षे सातत्याने ते अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते.