‘लोकमत’च्या मालिकेचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2016 09:36 PM2016-02-29T21:36:39+5:302016-03-01T00:10:22+5:30

याही पुढे जाऊन त्यांना शास्त्रोक्त पध्दतीने प्रशिक्षण मिळण्याच्या दृष्टीने जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्याशी ‘लोकमत’ने साधला थेट संवाद...

Praise of the 'Lokmat' series | ‘लोकमत’च्या मालिकेचे कौतुक

‘लोकमत’च्या मालिकेचे कौतुक

Next

कलेबरोबर क्रीडा क्षेत्रातही रत्नागिरी जिल्ह्याचे नाव अग्रक्रमे घेतले जाते. खो-खो, कबड्डी, क्रिकेट, बास्केट बॉल, योगासन, कॅरम, धनुर्विद्या, टेबलटेनिस यांसारख्या विविध खेळात यश मिळवणाऱ्या खेळाडूंची संख्या अधिक आहे. पुरूषांबरोबर महिला खेळाडूंनीही विविध खेळात चमकदार कामगिरी केली आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवणाऱ्या ‘रत्नकन्यां’ची दखल ‘लोकमत’ने घेऊन संपूर्ण महिनाभर मालिकेव्दारे रत्नकन्यांच्या यशाचा आढावा प्रसिध्द केला. याची दखल जिल्हा क्रीडा कार्यालयाने घेतली आहे. शासनाकडे याचा प्रस्ताव पाठवून खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय, आॅलिम्पिक स्तरावरील प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करणार आहोत. शिवाय काही मुलींना प्रशिक्षणासाठी पाठविणार आहोत. भविष्यात पुरस्काराच्या यादीत रत्नागिरीचे नाव दरवर्षी निश्चितच असेल! रत्नागिरीने आपली गुणवत्ता सिध्द केली आहेच, पण याही पुढे जाऊन त्यांना शास्त्रोक्त पध्दतीने प्रशिक्षण मिळण्याच्या दृष्टीने जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्याशी ‘लोकमत’ने साधला थेट संवाद...

प्रश्न : रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय खेळाडूंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, आंतरराष्ट्रीयस्तरावर काहीवेळा मुली कमी पडतात, त्यासाठी काय करता येईल?
उत्तर : राष्ट्रीय पातळीवर यश संपादन करणाऱ्या रत्नकन्यांची संख्या निश्चितच वाढत आहे. ‘लोकमत’ने प्रसिध्द केलेल्या ‘यश रत्नकन्यां’च्या मालिकेची दखल जिल्हा क्रीडा कार्यालयाने घेतली आहे. या विद्यार्थिनींच्या संख्येनुसार रत्नागिरीत सुटीच्या काळात प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय, आॅलिम्पिक स्तरावरील प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे, तर एखाद-दुसरी संख्या असलेल्या खेळाडूंना पुणे येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्याकरिता प्रयत्नशील राहणार आहोत.
प्रश्न : रत्नागिरी तालुक्यातील वाटद - खंडाळ्यातील मुलींचा क्रिकेट संघ महाराष्ट्रातील एक नंबरचा संघ आहे. शिवाय महाराष्ट्र संघाचे कर्णधारपदही रत्नागिरीची कन्या भूषवत आहे. ग्रामीण भागातील हा संघ भारताचा सर्वोत्तम संघ होण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकता?
उत्तर : ग्रामीण भागातील महिला खेळाडूंचा क्रिकेटचा संघ महाराष्ट्रातील एक नंबरचा संघ आहे. यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे दरवर्षी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येते. मात्र, यावर्षीच्या उन्हाळी सुटीत मुलींच्या संघासाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात येईल, जेणेकरून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या विविध टीप्स देता येतील. भविष्यात बलाढ्य संघ होण्यासाठी प्रशिक्षण उपयुक्त ठरेल.
प्रश्न : गेल्या काही वर्षात क्रीडाक्षेत्रात महिलांची प्रगती स्तुत्य आहे. परंतु शासकीय पुरस्कार मिळवण्यात रत्नागिरीतील महिला खेळाडूंची संख्या मोजकीच आहे, ती वाढेल का?
उत्तर : हो, भविष्यात पुरस्कारप्राप्त खेळाडूंच्या यादीत रत्नागिरीचे नाव नक्कीच अग्रभागी असेल. अनेक महिला खेळाडूंनी विविध खेळात चमकदार कामगिरी करीत यश संपादन केले आहे, करीत आहेत. त्यामुळे पुरस्कार निवड यादीत रत्नागिरीतील एक तरी कन्या दरवर्षी नक्कीच असेल.
प्रश्न : स्वीमिंग पूल केव्हा खुला होईल?
उत्तर : साळवीस्टॉप येथील स्वीमिंग पुलाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. येत्या दीड ते दोन महिन्यात अद्ययावत सुविधेसह तलाव पोहण्यासाठी नागरिकांना उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे विभागीय पातळीपर्यंतच्या पोहण्याच्या स्पर्धेचे आयोजनही केले जाणार आहे.
प्रश्न : कोणत्या खेळात रत्नकन्यांचे वर्चस्व दिसून येते?
उत्तर : क्रिकेट, खो-खो, कीक बॉक्सिंग, बास्केट बॉलमध्ये मुलींचे वर्चस्व आहेच, शिवाय आंतरराष्ट्रीयस्तरावर योगासनात रत्नागिरीने आपला झेंडा उंचावला आहे. तसेच कॅरम, धनुर्विद्या, बॅटमिंटनस्पर्धेतही यश मिळवित आहेत.
प्रश्न : रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या स्तरावरील स्पर्धा घेण्यात येतात?
उत्तर : विभागीय, राज्यस्तरापर्यंतच्या विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन रत्नागिरीत करण्यात येते. विविध जिल्ह्यातून येणाऱ्या संघांचा खेळ पाहून निश्चितच आपल्या खेळामध्ये सुधारणा करणे शक्य होते. शिवाय संघटनेच्या माध्यमातून विविध खेळाची प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येतात. भविष्यात शिबिरे वाढविण्यासाठी विशेष भर देण्यात येईल.
प्रश्न : राज्यस्तरीय, विभागीय पातळीवर खेळणाऱ्या संघांना आलेल्या समस्यांचे निरसन कसे केले जाते?
उत्तर : जेव्हा जिल्ह्याचा संघ विभागीय, राज्यस्तरीय अथवा राष्ट्रस्तरावर खेळण्यास जातो तेव्हा जिल्हा क्रीडा कार्यालयाची जबाबदारी निश्चित वाढते. खंडाळ्याच्या मुलींचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेसाठी गेला होता, त्यावेळी विभागीय स्पर्धादेखील होत्या. अशावेळी संघाला एकच स्पर्धा खेळणे शक्य होते. क्रीडाशिक्षक राजेश जाधव यांनी माझ्याशी संपर्क साधला, त्यावेळी तातडीने संयोजकांशी बोलून स्पर्धेची तारीख बदलून घेण्यात आली. त्यामुळे या संघाने दोन्ही स्तरावरील स्पर्धा खेळून यश संपादन केले. संघाचे यश हे जिल्ह्याचे यश आहे. केलेले प्रयत्न फळास आले.
- मेहरून नाकाडे

Web Title: Praise of the 'Lokmat' series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.