‘चक्काजाम’ स्थगित झाल्याने ‘शक्तीप्रदर्शन’
By admin | Published: February 27, 2016 01:12 AM2016-02-27T01:12:52+5:302016-02-27T01:12:52+5:30
सरकारविरोधी घोषणाबाजी : वैभववाडी बाजारपेठेत काँग्रेसने काढली फेरी
वैभववाडी : काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नियोजित एसटी ‘चक्का जाम’ आंदोलन करण्याचे सांगितल्यामुळे आंदोलनासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांनी बाजारपेठेत फेरी काढून शक्तीप्रदर्शन केले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही झाली. आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर बाजारपेठेत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दोडामार्ग बसस्थानकाच्या कार्यक्रमावरुन शिवसेनेने काँग्रेसला आव्हान दिले होते. त्या पार्श्वभूमिवर कार्यक्रम रोखण्यासाठी गेलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. कार्यकर्त्यांवरील गुन्हे तत्काळ मागे न घेतल्यास शुक्रवारी दुपारी जिल्ह्यात सर्वत्र एसटी स्थानकांवर चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा नारायण राणे यांनी गुरुवारी दिला होता. त्याअनुषंगाने काँग्रेस कार्यकर्ते आमदार संपर्क कार्यालयाकडे जमले होते. मात्र, पोलीस व एसटी अधिकाऱ्यांच्या विनंतीवरुन राणेंनी नियोजित आंदोलन स्थगित केल्याचे कळविले. त्यामुळे वैभववाडीत जमलेल्या कार्यकर्त्यांनी शासनाविरुद्ध घोषणा देत पक्षाचे झेंडे फडकावत बाजारपेठेतून फेरी काढून शक्तीप्रदर्शन केले. यावेळी तालुकाध्यक्ष भालचंद्र साठे, बांधकाम सभापती दिलीप रावराणे, सभापती शुभांगी पवार, उपसभापती बंड्या मांजरेकर, नगराध्यक्ष रवींद्र्र रावराणे, जिल्हा परिषद सदस्या स्नेहलता चोरगे, पंचायत समिती सदस्य नासीर काझी, वैशाली रावराणे, जिल्हा बँकेचे संचालक दिगंबर पाटील, बाजार समितीचे संचालक अरविंद रावराणे, नगरसेवक संताजी रावराणे, तसेच भालचंद्र्र जाधव, प्रिया तावडे, बाळा हरयाण, संतोष कुडाळकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)