प्रमोद जठार यांचा भाजपा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा, उद्या मुख्यमंत्र्यांकडे सोपवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 07:52 PM2019-03-04T19:52:45+5:302019-03-04T19:52:57+5:30
भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. तसेच नाणार प्रकल्प रद्द केल्याचा निषेधही व्यक्त केला.
सिंधुदुर्ग : भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. तसेच नाणार प्रकल्प रद्द केल्याचा निषेधही व्यक्त केला. उद्या मुख्यमंत्र्यांना भेटून राजीनामा सादर करणार असल्याचे ते म्हणाले. राजकीय भांडणामुळे नाणार प्रकल्प रद्द झाला. यात कोकणचे पुढील पन्नास पिढ्यांचे नुकसान झाले. कोकणवासीयांनी कोकण रेल्वे, मुंबई गोवा महामार्ग, धरण प्रकल्प आदी विकास कामांना जमिनी दिल्या. त्याचा फायदा जगाला झाला. पण कोकणात रोजगार निर्माण झाला नाही.
आता तीन लाख कोटींचा प्रकल्प आणि लाखो रोजगार संधी या प्रकल्पातून होणार होता. मात्र प्रकल्पच रद्द झाल्याने आम्ही निराश झालो आहोत. कोकणवासीयांना रोजगार निर्माण करून देण्याची आम्ही घोषणा केली होती. पण प्रकल्प रद्द झाल्याने ती पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जठार यांनी जाहीर केले. प्रमोद जठार यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जठार म्हणाले, पर्यावरणाची हानी, प्रदूषण आदी कारणांमुळे प्रकल्प रद्द झाला असता तर ते आम्ही समजू शकलो असतो. त्यासाठी लोकप्रतिनिधी, पत्रकार, स्थानिक ग्रामस्थ यांना घेऊन रिफायनरी कंपनीने पानीपत दौरा केला. तेथील रिफायनरी दाखवली. तेव्हा कोणतेही प्रदूषण अथवा निसर्गाची हानी झाली नसल्याचे लक्षात आले. परंतु याबाबतची कोणतीही माहिती न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला विरोध केला ही चुकीची घटना आहे. प्रबोधनकार ठाकरे यांच्या नातवाकडून ही अपेक्षा नव्हती. जठार म्हणाले, चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सिंधुदुर्गात येत आहेत. त्याचवेळी आपण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहोत. तसेच पुढील भूमिका नंतर जाहीर केली जाईल असे ते म्हणाले.