प्रसाद कुलकर्णींचा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ सदस्यपदाचा राजीनामा
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: December 15, 2022 06:13 PM2022-12-15T18:13:32+5:302022-12-15T19:59:02+5:30
शासनातर्फ़े नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या समितीकडून निवडल्या गेलेल्या पुस्तकाला आधी पुरस्कार जाहीर करणे आणि नंतर तो अपमानास्पदरित्या परत घेणे हे निव्वळ अनाकलनीय
सिंधुदुर्ग : ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला राज्य पुरस्कार शासनाने अध्यादेश काढून रद्द करणे यावरुन महाराष्ट्राच्या साहित्यिक वर्तुळात मोठे वादळ उठले आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा शासननियुक्त सदस्यपदाचा आपण राजीनामा देत असल्याचे प्रसाद कुलकर्णी यांनी गुरूवारी जाहीर केले. त्यांनी आपला राजीनामा मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिवांना तातडीने सादर केला आहे.
याबाबत प्रसाद कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, गेले दोन दिवस माझ्या आनंदयात्रेच्या निमित्ताने विदर्भ दौऱ्यावर होतो. गुरूवारी सकाळी मुंबईत परत आल्यावर या सर्व प्रकरणाचा मी जेवढा सखोल आणि संतुलित करता येईल तेवढा अभ्यास केला. शासनातर्फ़े नियुक्त केलेल्या तज्ज्ञांच्या समितीकडून निवडल्या गेलेल्या पुस्तकाला आधी पुरस्कार जाहीर करणे आणि नंतर तो अपमानास्पदरित्या परत घेणे हे निव्वळ अनाकलनीय आहे.
अनुचित निर्णयाचा निषेध
माझ्या आतापर्यंतच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक जीवनात मी कधीही एखाद्या विशिष्ट विचारधारेचा झेंडा खांद्यावर घेतला नाही. किंवा कोणत्याही वादात पडलो नाही. माझी बांधिलकी नेहमीच माय मराठीच्या दुधाशी राहिली. तेव्हा कोणताही पूर्वग्रह मनात न बाळगता ह्या अनुचित निर्णयाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा मी राजीनामा देत आहे.