‘त्या’ टोळीचे परजिल्ह्यांतही प्रताप
By admin | Published: June 12, 2016 12:48 AM2016-06-12T00:48:21+5:302016-06-12T00:48:21+5:30
अनेकांना गंडा : पावणेपाच लाखांचे दागिने जप्त
रत्नागिरी : दागिने घेण्याच्या बहाण्याने दुकानात शिरून चोरी करणाऱ्या टोळीतील चौघांच्या पोलिस कोठडीत शनिवारी न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली. सातजणांच्या या टोळीतील तीन संशयितांचा शोध पोलिस घेत आहेत.
दरम्यान या टोळीने रत्नागिरीसह सांगली, पुणे, कोल्हापूर जिल्ह्यांमध्येही अनेक सराफांना गंडा घातला असल्याचे तपासात पुढे आले आहे. या चोऱ्यांमधील सुमारे ४ लाख ७३ हजार १६१ रुपयांचे दागिने जप्त करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले.
काही दिवसांपूर्वी मारुती मंदिर परिसरातील एका ज्वेलर्स दुकानासमोर चौघेजण संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारावर पोलिसांनी ज्योत्स्ना कच्छवाह, सूरज कच्छवाह, कमल विनोद राठोड, संदीप राम जाधव या चौघांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडे ५१ हजार रुपये रोख आणि दागिने आढळले होते. याबाबतच्या चौकशीत ते उडवाउडवीची उत्तरे देत होते, त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि या चौघांना तत्काळ अटक करण्यात आली. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली.
ही सातजणांची टोळी गेल्या काही महिन्यांपासून रत्नागिरीत कार्यरत होती. अटक करण्यात आलेल्या ज्योत्स्ना कच्छवाह, सूरज कच्छवाह, संदीप जाधव व कमल राठोड यांचा समावेश आहे. रत्नागिरीसह लांजा, राजगड, पुणे, सांगली, गारगोटी, आजरा व निपाणी या ठिकाणी चोऱ्या केल्या असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. त्यातील रत्नागिरी, लांजा, सांगली व गारगोटी येथे चार गुन्हे उघड झाले आहेत.
या चोऱ्यांमधील सुमारे ४ लाख ७३ हजार १६१ रुपयांचे दागिने जप्त करण्यात यश आले आहे. पुढील तपासासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक पुणे येथे रवाना करण्यात येणार आहे. दरम्यान, शनिवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.