विधिमंडळामध्ये अभ्यासानेच प्रकटावे!
By admin | Published: July 5, 2017 11:35 PM2017-07-05T23:35:40+5:302017-07-05T23:35:40+5:30
विधिमंडळामध्ये अभ्यासानेच प्रकटावे!
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : विधिमंडळ हे न्याय मंदिर आहे. जनता ही त्या मंदिरातील दैवत असते. येथे जाणारा प्रत्येक लोकप्रतिनिधी जनतेचा सेवक असतो. जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी लोकप्रतिनिधींनी संसदीय आयुधांची माहिती घेऊन अभ्यासातून प्रकटावे. चारित्र्य, निष्ठा, प्रामाणिकपणा आणि कर्तव्य बजावताना नि:स्वार्थ भाव हे गुण नव्या पिढीतील लोकप्रतिनिधींनी अंगिकारले पाहिजेत, तरच लोकशाही समृध्द होईल, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व कॉँग्रेसचे नेते आमदार नारायण राणे यांनी बुधवारी केले.
येथील राजारामबापू नाट्यगृहात माजी ग्रामविकासमंत्री अण्णासाहेब डांगे यांचा ८१ व्या वाढदिवसानिमित्त आमदार राणे, आमदार जयंत पाटील यांच्याहस्ते अभीष्टचिंतनपर सत्कार करण्यात आला. यावेळी ‘लोकप्रतिनिधी, विधिमंडळ व तेथील कामकाज’ या विषयावर राणे यांनी मार्गदर्शन केले. अण्णासाहेब डांगे फाऊंडेशनने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेचा समारोपही झाला.
राणे म्हणाले की, लोकहित हेच कर्तव्य मानून काम करणाऱ्या अण्णासाहेब डांगे यांच्यासारख्या प्रतिभावंत लोकप्रतिनिधींची विधिमंडळात गरज आहे. समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. आजच्या लोकप्रतिनिधींकडे जबाबदारीच्या जाणिवांचा अभाव आहे.
ते म्हणाले की, राज्यातील जनतेला विविध योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे, त्यांना सुख, समाधान, आनंद आणि सुरक्षितता प्रदान करणे ही नैतिक जबाबदारी विधिमंडळाची असते. त्यामुळे तेथे येणारा प्रत्येक लोकप्रतिनिधी तेवढाच अभ्यासू असणे गरजेचे असते. मतदारांनी जागरुकपणे लोकप्रतिनिधी निवडल्यास आदर्श प्रस्थापित होईल.
राणे म्हणाले की, जनहिताची कामे करुन घेताना प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी कायद्याचा प्रभावी अभ्यास आवश्यक आहे. विधिमंडळाचे कायदे, कामकाजाची पध्दत, जनहिताची कामे करुन घेताना वापरावयाची विविध संसदीय आयुधे, प्रशासन अशा सर्व अंगानी लोकप्रतिनिधींनी अभ्यास करणे गरजेचे आहे. अभ्यासातून प्रकटणारा लोकप्रतिनिधी त्याच्या जीवनात यशस्वी होतो. पूर्वी विधिमंडळात अनेक सदस्य तीन-तीन तास बोलायचे. आताच्या विधिमंडळात हे चित्र अपवादाने दिसते.
आ. जयंत पाटील म्हणाले की, प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करीत घडलेले अण्णासाहेब डांगे यांचे नेतृत्व राज्याला स्वाभिमानी व करारी बाण्याचे म्हणूनच परिचित आहे. ‘टॅँकरमुक्त महाराष्ट्र’ आणि स्वच्छतेसाठी ‘घर तेथे शौचालय’ या सामान्य जनतेच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या दोन संकल्पनांना त्यांनी जन्म दिला व त्या यशस्वी केल्या. आजचे सरकार जलसंधारणाची कामे करुन टॅँकरमुक्तीची घोषणा करत आहे. निवडणुकांवर लक्ष ठेवून निर्णय घेणारे सरकार सत्तेत आहे. आपण काय निर्णय घेतला, हे कळण्याआधीच स्वत:चे सत्कार करवून घेत आहे. निवडणुकीत सत्तेवर आल्यास धनगर समाजाला आरक्षण देण्याचा शब्द तीन वर्षात त्यांनी पाळला नाही.
अण्णासाहेब डांगे म्हणाले की, वाढदिवसाच्या निमित्ताने समाज उन्नत होईल, असे उपक्रम राबवले गेले. आजपर्यंतच्या सार्वजनिक जीवनात जे भाग्य मिळाले, त्यामुळे कृतकृत्य झालो आहे.
दत्तात्रय कदम यांनी स्वागत केले. अॅड. धैर्यशील पाटील यांनी परिचय करून दिला. परेश पाटील यांनी आभार मानले. बजरंग कदम यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास विजयभाऊ पाटील, विनायकराव पाटील, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, आनंदराव मलगुंडे, अॅड. चिमण डांगे, शहाजी पाटील, खंडेराव जाधव, विश्वनाथ डांगे, पीरअली पुणेकर, सौ. छाया पाटील, अॅड. बी. एस. पाटील, एकनाथराव जाधव, एल. एन. शहा उपस्थित होते.
ठाकरेंविषयी कृतज्ञता
राणे यांनी आपल्या भाषणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ‘साहेब’ असा उल्लेख करीत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सोळाव्या वर्षी शिवसैनिक, शाखाप्रमुख, नगरसेवक, ‘बेस्ट’चा अध्यक्ष, आमदार, विरोधी पक्षनेता, मंत्री आणि वयाच्या ४७ व्या वर्षी मुख्यमंत्री असे सर्व काही मला साहेबांनी भरभरुन दिले, अशी भावना राणे यांनी व्यक्त केली.