Sindhudurg: कोळंब येथील ग्रामसेवक मारहाण प्रकरणी पाच जणांना अटकपूर्व जामीन मंजूर

By सुधीर राणे | Published: May 21, 2024 12:30 PM2024-05-21T12:30:16+5:302024-05-21T12:31:39+5:30

कणकवली: मालवण तालुक्यातील कोळंब येथील ग्रामसेवक प्रकाश विठ्ठल सुतार यांना कर्तव्यावर असताना कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी कोळंब उपसरपंच ...

Pre arrest bail granted to five persons in the case of beating of Gramsevak in Kolamb Malvan | Sindhudurg: कोळंब येथील ग्रामसेवक मारहाण प्रकरणी पाच जणांना अटकपूर्व जामीन मंजूर

Sindhudurg: कोळंब येथील ग्रामसेवक मारहाण प्रकरणी पाच जणांना अटकपूर्व जामीन मंजूर

कणकवली: मालवण तालुक्यातील कोळंब येथील ग्रामसेवक प्रकाश विठ्ठल सुतार यांना कर्तव्यावर असताना कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर, ग्रामपंचायत सदस्या संपदा प्रभू, संजना शेलटकर व नंदा बावकर व निखील विजय नेमळेकर यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सशर्थ अटकपूर्व जामिन मंजूर केला. 

३० एप्रिल २०२४ रोजी कोळंब ग्रामपंचायतीची तहकुब मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसेवक प्रकाश सुतार हे कक्षात निवडणूकीसंदर्भातील कामे करत असताना सकाळी १०.३५ वाजण्याच्या सुमारास उपसरपंच व तीन सदस्यानी त्यांना गेल्या सहा महिन्यापूर्वी दिलेल्या विकास कामांच्या मुद्द्यांबाबत आजच मासिक सभेत उत्तरे द्या, असे म्हणून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्यांना खर्चीवरून ढकलून खाली पाडले.

या प्रकाराबाबत दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अन्य ग्रामसेवकांना घेऊन मालवण येथील विस्तार अधिकारी यांच्या कार्यालयात असताना दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास निखील नेमळेकर याने आपल्या वडिलांबाबत तक्रार दिल्यास बघून घेईन अशी धमकी दिली. याबाबत सुतार यांनी मालवण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पाचही जणांविरूद्ध ३५३, ३३२, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत संशियातांच्यावतीने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला. सुनावणीत त्याच दिवशी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास उपसरपंच व सदस्या हे ग्रामसेवकांच्या कक्षात गेलेले असताना ग्रामसेवकांनी त्यापैकी एका महिला सदस्याला अश्लिल शिवीगाळ व हातवारे केल्याप्रकरणी ग्रामसेवकाविरूद्ध मालवण पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच वरिल सदस्यांच्या तक्रारीवरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नेमलेल्या चौकशीत ग्रामसेवक व सरपंच यांना दोषी धरून अपहारीत रक्कम वसूलीचे शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश दिले होते, हे निदर्शनास आणून देण्यात आले.

सुनावणीअंती न्यायालयाने प्रत्येकी ५० हजाराचा अटकपूर्व जामिन मंजूर करतानाच मालवण पोलिस ठाण्यात सोमवार व गुरूवारी हजेरी लावणे, सरकारी पक्षाच्या पुराव्यात ढवळाढवळ न करणे आदी अटी घातल्या आहेत.सर्व संशयितांच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

Web Title: Pre arrest bail granted to five persons in the case of beating of Gramsevak in Kolamb Malvan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.