आमदार वैभव नाईकांना दिलासा, कनेडी राड्याप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर
By सुधीर राणे | Published: April 19, 2023 01:54 PM2023-04-19T13:54:03+5:302023-04-19T13:54:26+5:30
माघी गणेश जयंतीची तयारी सुरू असताना कुणाल सावंत याला संदेश सावंत यांनी मारहाण केली
कणकवली: कणकवली तालुक्यातील सांगवे-कनेडी येथे झालेल्या राड्याप्रकरणी आमदार वैभव नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व नगरसेवक कन्हैया पारकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल असलेल्या आमदार नाईक, सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांनी ओरोस येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानुसार या तिघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी मंजूर केला आहे.
२४ जानेवारी २०२३ रोजी माघी गणेश जयंतीची तयारी सुरू असताना या गुन्ह्यातील एक आरोपी कुणाल सावंत याला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी मारहाण केली. या झटापटीत गोट्या सावंत यांचा आयफोन चोरण्यात आला होता. याप्रकरणी संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दाखल गुन्ह्यात आमदार वैभव नाईक, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व नगरसेवक कन्हैया पारकर यांच्या सांगण्याने जमावाला उद्युक्त करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला व राडा घडविण्यासाठी या तिघांनी जमावाला उद्युक्त केले असे म्हटले होते.
तर या दरम्यान आमदार वैभव नाईक हातात दांडा घेऊन पोलिस व इतरांना धमकावण्याचा व भडकवण्याचा प्रयत्न करत होते. आमदार वैभव नाईक, सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांनी जमावाला उद्युक्त केल्याने संदेश उर्फ गोट्या सावंत यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यामुळे सावंत यांच्या छाती, पाय, हाताला गंभीर दुखापत झाली.
याबाबतच्या तक्रारीनुसार भादवि कलम ३०७, ३९२, ३२४, ३२३, १४७, १४३, १४८, १४९ अन्वये आमदार वैभव नाईक, सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांच्या विरोधात कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्याकडून याप्रकरणी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांच्याकडे वकिलांमार्फत अटकपूर्व जमिनीसाठी अर्ज करण्यात आला होता. त्या अर्जावर सुनावणी होत या तिघांचाही जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. संशयित आरोपींच्यावतीने ऍड. उमेश सावंत यांनी युक्तीवाद केला.