जनतेच्या हितासाठी झटणाऱ्या उमेदवारांना पसंती
By Admin | Published: March 28, 2016 11:01 PM2016-03-28T23:01:51+5:302016-03-29T00:09:01+5:30
कुडाळ नगरपंचायत निवडणूक : मतदारांच्या भावना, राजकारणापलिकडे समाजकारणाची आवड असणाऱ्यांना मिळेल संधी
रजनीकांत कदम --कुडाळ नगरपंचायतीचे निवडून जाणारे उमेदवार हे अभ्यासू, राजकारणापेक्षा समाजकारणाची आवड असणारे व विकासात्मक अजेंडा तयार करून जनतेच्या व कुडाळच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारे असावेत, अशी मते कुडाळच्या मतदारांतून येत आहेत. अत्यावश्यक गोष्टींबाबत सुधारणा करणे, विशेष करून मुलांसाठी वसतिगृह उभारणे, वाहतुक कोंडीचा प्रश्न सोडविणे, अशा अनेक समस्यांचे निराकरण करणे आवश्यक असून, नवीन नगरसेवकांनी याकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे, असेही मत काही मतदार नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
कुडाळचे नगरसेवक कसे असावेत, याबाबत कुडाळातील अनेक नागरिकांशी चर्चा करण्यात आली. यापैकी काही मतदारांच्या निवडक प्रतिक्रिया येथे प्रातिनिधीक स्वरूपात देण्यात आल्या आहेत.
काही ठिकाणी तर अनेक मतदारांनी अशी मते व्यक्त केली की, या नगरपंचायतीमध्ये नव्या, अभ्यासू चेहऱ्यांना संधी मिळणे आवश्यक आहे. मात्र, त्यांनीही मागच्यांचे धडे गिरविता कामा नयेत. ठेकेदारी पध्दत अवलंबिणाऱ्यांना व काही जुन्या चेहऱ्यांना दूर केले पाहिजे, अशी मते मतदारांनी व्यक्त केली आहे. निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मतदार कोणाला कौल देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यासाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.