देवबलवत्तर गव्याच्या धडकेत गर्भवती महिला थोडक्यात बचावली; भाऊ मात्र जखमी
By अनंत खं.जाधव | Published: August 23, 2023 08:55 PM2023-08-23T20:55:31+5:302023-08-23T20:55:40+5:30
सावंतवाडी माजगाव येथील घटना, दोघांची प्रकृती स्थिर आहे. किरकोळ जखमा झाल्या आहेत, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ही घटना रात्री ८ वाजण्याच्या सुमारास माजगाव भाईसाहेब समाधी समोर घडली.यात लावण्या मेस्त्री (रा. तळवडे) व प्रसाद नाईक (रा. साटेली तर्फ सातार्डा) हे दोघे जखमी झाले आहेत. देवबलवत्तर म्हणून या धडकेत गर्भवती असलेली लावण्या थोडक्यात बचावली तर प्रसाद याला गव्याची धडक बसली मात्र सध्या दोघांचीही प्रकृती स्थिर असून येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लावण्या ही गरोदर असल्यामुळे तिच्या उपचारासाठी भाऊ प्रसाद हा तिला घेऊन सावंतवाडीत डॉक्टरकडे आला होता. यावेळी माजगाव येथे दुचाकीने परतत असताना अचानक रस्त्याच्या आडव्या येणाऱ्या गव्याने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दोघेही रस्त्यावर पडले तर यावेळी गव्याने प्रसाद यांच्या पोटावर पाय ठेवणार एवढ्यात तो बाजूला झाला व आपल्या बहिणीला ही बाजूला केले. हा प्रकार तिथून जाणाऱ्या माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांच्यासह बंटी शेख, गुरु वारंग,अवी पडते आदी युवकांनी पाहिला व त्यांना तात्काळ हरिश्चंद्र पाटकर यांच्या रिक्षात घालून सावंतवाडी कुटीर रूग्णालयात दाखल केले.
दोघांची प्रकृती स्थिर आहे. किरकोळ जखमा झाल्या आहेत, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान सावंतवाडी शिरोडा मार्गावर माजगाव येथून गव्याचा कळप ये जा करत असतो मागील वर्ष भरात अनेक घटना घडल्या आहेत त्यामुळे वनविभागाने यावर काहि तरी उपाय योजना करावी अशी मागणी होत आहे.