मायनिंगचे हस्तक म्हटल्यानेच निषेध, प्रेमानंद देसाई यांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 07:55 PM2019-01-13T19:55:19+5:302019-01-13T19:55:52+5:30
दोडामार्ग तालुक्यातील पर्यावरणाबरोबरच तेथील रहिवाशांचे जीवन पर्यावरणपूरक व समृद्ध रहावे यासाठी आमची लढाई ही खंत नसून इको सेन्सिटिव्हविरोधी दोडामार्ग बचाव मंचने काढलेला मोर्चा पाहून स्टॅलिन दयानंद यांना उपरती झाली आहे.
सावंतवाडी - दोडामार्ग तालुक्यातील पर्यावरणाबरोबरच तेथील रहिवाशांचे जीवन पर्यावरणपूरक व समृद्ध रहावे यासाठी आमची लढाई ही खंत नसून इको सेन्सिटिव्हविरोधी दोडामार्ग बचाव मंचने काढलेला मोर्चा पाहून स्टॅलिन दयानंद यांना उपरती झाली आहे. शेतकऱ्यांना मायनिंगचे हस्तक म्हणणे कितपत योग्य आहे? त्यामुळे आम्ही निषेध केला, असे मत सिंधुदुर्ग सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले.
वनशक्तीचे संदीप सावंत यांनी शनिवारी दोडामार्गबाबत आपली भूमिका मांडली. त्यानंतर त्यावर देसाई यांनी पत्रकातून उत्तर दिले आहे.
या पत्रकात देसाई यांनी म्हटले आहे की, २३ डिसेंबर रोजी स्टॅलिन दयानंद यांनी आपले म्हणणे दोडामार्ग येथे येऊन मांडावे, दोडामार्ग विषयीच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशाप्रकारे आवाहन करण्यात आले होते. दोडामार्ग येथे तारीख व वेळ जाहीर करून यावे व आमच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे द्यावीत, असे आवाहन सरपंच सेवा संघामार्फत केले होते. त्याला वेळेत उत्तरे दिली असती तर शेतकºयांचे संभ्रम दूर केले असते. येथील शेतकºयांना मायनिंगचे हस्तक ठरविले नसते, तर स्टॅलिन दयानंद यांचा निषेध करण्याचा प्रसंग आला नसता.
पण केवळ आपली संस्था वनशक्ती फाऊंडेशनला मिळणारे विदेशी फंड चालू रहावेत तसेच आपल्या पोटापाण्यासाठी दोडामार्गमधील शेतकºयांना नाहक वेठीस धरून त्यांच्या उपजीविकेच्या साधनांवर, वृक्ष, शेतीवर निर्बंध आणून स्वत:ला पर्यावरणवादी ठरविण्याचा हा प्रयत्न आहे. त्यासाठी शेतक-यावर संक्रांत आली तरी स्टॅलिन यांना फरक पडत नाही.
दोडामार्गमधील शेतक-यांच्या नावावर असणा-या खासगी, सामाईक जमिनी ह्या कवळकाड, बागायती, नागली शेती, काजू बागायती असून, काही प्रमाणात दगडसदृश व तीव्र उताराच्या आहेत. या जमिनीवर उपलब्ध साधनसामग्रीवर शेतकरी आपली उपजीविका करतो.
वनविभागाकडून आलेल्या पत्राचा स्टॅलिन दयानंद व संदीप सावंत यांनी अभ्यास करावा. सरसकट वृक्षतोड बंदी व भविष्यातील प्लॉट डेव्हलपमेंट,फेरपालटाने नागली शेती, दगडातील क्वॉरी, चिरेखाण ही उपजीविकेची साधने नष्ट होणार असतील तर स्टॅलिन यांची पूजा करून पोट भरणार काय? असा पलटवार केला आहे. यापूर्वी त्यांनी किती शेतक-यांच्या भेटी घेऊन सविस्तर चर्चा करून पर्यावरणाचा विषय समजावून सांगितला हे जाहीर करणे आवश्यक असताना फक्त उंचावरून शेळ््या हाकून इथला शेतकरी संपवून फक्त वनशक्ती फाऊंडेशन जगविण्यासाठी प्रयत्न करू नये, असा सल्लाही दिला आहे.