सावंतवाडीत उभारण्यात येणाऱ्या अद्यावत भाजी मंडईचा आराखडा तयार : नगराध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 06:07 PM2021-12-08T18:07:06+5:302021-12-08T18:08:50+5:30
ही इमारत सहा मजली असणार आहेत यामध्ये 116 गाळे तर 115 ओटे असणार आहेत. यासाठी तब्बल 13 कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून आराखड्याला मंजुरी मिळतात त्यासाठीही पाठपुरावा केला जाणार आहे.
सावंतवाडी : शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडईची नव्याने उभारणी करण्यात येणार असून ही इमारत अद्यावत अशी सहा मजली असणार आहे. यासाठी तेरा कोटी रुपये खर्च अपेक्षित असून इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा आवश्यक त्या तांत्रिक मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी बुधवारी येथे दिली. या संकुलात गाळ्यासह पार्किंगची व्यवस्था ही करण्यात आली आहे असेही परब म्हणाले.
ते सावंतवाडी नगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, सत्यवान बांदेकर बंटी पुरोहीत, अमित परब आदी उपस्थित होते.
परब म्हणाले, सावंतवाडी शहराच्या दृष्टीने नगर पालिका प्रशासनाकडून एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. संत गाडगेबाबा भाजी मंडईची नव्या इमारतीचा आराखडा तयार आला आहे. यासाठी आवश्यक त्या तांत्रिक मंजुरीच्या सर्व बाबी पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसा प्रस्ताव शासन स्तरावर पाठवण्यात आला आहे. ही इमारत सहा मजली असणार आहेत यामध्ये 116 गाळे तर 115 ओटे असणार आहेत. यासाठी तब्बल 13 कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून आराखड्याला मंजुरी मिळतात त्यासाठीही पाठपुरावा केला जाणार आहे.
सावंतवाडी नगरपालिकेला अग्निशामक बंबाची गरज होती तो बंब आता मिळाला असून आम्ही शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक मंजुरी ही प्राप्त झाली आहे येणाऱ्या काळात त्यासाठी निधी मिळावा म्हणून शासनास कडे तसा प्रस्तावही तयार केला जाणार आहे असेही परब म्हणाले.