वागदेतील कृषी महोत्सवाच्या तयारीने घेतला वेग

By admin | Published: December 15, 2015 10:46 PM2015-12-15T22:46:35+5:302015-12-15T23:26:33+5:30

दीडशे जणांना हेलिकॉप्टर सवारी : तीनशेहून अधिक विविध स्टॉल्सची उभारणी

The preparations for the Agri festival were organized in the velah | वागदेतील कृषी महोत्सवाच्या तयारीने घेतला वेग

वागदेतील कृषी महोत्सवाच्या तयारीने घेतला वेग

Next

कणकवली: जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागामार्फत वागदे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी, पशुपक्षी, पर्यटन महोत्सवाच्या तयारीने वेग घेतला आहे. कृषी, पशुपक्षी, मत्स्यव्यवसाय प्रदर्शनासोबत सांस्कृतिक कार्यक्रम आणि लहानग्यांसाठी अम्युझमेंट दालन या महोत्सवात असेल. त्याचबरोबर हेलिकॉप्टरमधून सिंधुदुर्ग दर्शनचा विशेष उपक्रम यावेळी करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. वागदे ग्रामपंचायतमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, शिक्षण सभापती गुरूनाथ पेडणेकर, कणकवली सभापती आस्था सर्पे, उपसभापती बाबा वर्देकर, वागदे सरपंच संदीप सावंत, जिल्हा परिषद सदस्य सुरेश ढवळ आदी उपस्थित होते. २३ ते २६ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या कृषी प्रदर्शन आणि पर्यटन महोत्सवात ३०० हून अधिक स्टॉल्सचा समावेश असून आतापर्यंत ७० टक्केहून अधिक स्टॉलचे बुकिंग झाले आहे. २३ रोजी सकाळी १०.३० वाजता महोत्सवाचा औपचारिक प्रारंभ होणार आहे. त्या दिवशी सिंधुआरोग्य मेळाव्याचा शुभारंभ होणार आहे. रात्री ‘सारे प्रवासी घडीचे’ हे नाटक सादर होईल. २४ रोजी सकाळी ९ वाजता कणकवली शहरातून वाद्यवृंदा व सजावट स्पर्धेतील बैलगाड्यांसह शोभायात्रा वागदे येथे प्रदर्शनस्थळी जाणार आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी आमदार नीतेश राणे हे उपस्थित राहतील. सायंकाळी ४.३० वाजता ऊस लागवड विषयावरील परिंसंवाद व कृषी क्षेत्रातील प्रगतीशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वाजता ‘डॉग शो’चे आयोजन करण्यात आले आहे. रात्री आॅर्केस्ट्रा सादर होणार आहे. २५ रोजी पशुधन पालकांसाठी दुग्धशाळा व्यवस्थापन व मुक्त गोठा पद्धत परिसंवाद व आदर्श पशुधन पालकांचा सत्कार व गौरव केला जाणार आहे. दुपारी ४ वाजता सुदृढ गाय-वासरू, बैल व म्हैस स्पर्धा आयोजित केली असून यामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्ह्यातील पशुधन पालक सहभागी होणार आहेत. सायंकाळी ६.३० वाजता स्थानिक कलाकारांची समूह नृत्य स्पर्धा व रात्री ८.३० वाजता व्यावसायिका रंगभूमीवरील नाटक सादर होणार आहे.
२६ रोजी सकाळी १० वाजता कुक्कुटपालन, शेळी-मेंढी पालन परिसंवाद, ११.३० वाजता आंबा-काजू फळपीक लागवड परिसंवाद व कृषी व पशुसंवर्धन क्षेत्राशी निगडीत प्रगतशील संस्था व महिला बचत गट यांचा गौरव करण्यात येणार आहे. प्रदर्शन व महोत्सवाचा बक्षिस वितरण व समारोप कार्यक्रम दुपारी ४.३० वाजता होणार असून त्यानंतर रात्री स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
प्रदर्शनात कृषी विभाग व कोकण कृषी विद्यापीठाचा विशेष सहभाग असून कृषी तंत्रज्ञान व माहितीचे विशेष दालन याठिकाणी उभारले जाणार आहे. जिल्हा बॅँकेतर्फे प्रदर्शनादरम्यान कर्जावर २ टक्के विशेष सवलत दिली जाणार आहे. तर ४० टक्के अनुदानातील जनावरे खरेदीचे ४०० प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे आले असून या प्रदर्शनातून जनावरे पारखून खरेदी केली जाऊ शकतात.
शेतीक्षेत्रातील मजुरांचा प्रश्न सोडवण्यासाठी मशिनरी व स्वयंचलित विद्युत मोटरपंपांचे विशेष दालन असून प्रात्यक्षिके पाहावयास मिळेल. भातलावणी यंत्र, भातकापणी-मळणी यंत्र, भांगलणी, फवारणी यंत्र आदींचा समावेश असून नारळ काढण्याची शिडी, गृहोपयोगी वस्तू, बचतगटांनी तयार केलेली उत्पादने यांची रेलचेल असणार आहे. पशुपक्षी प्रदर्शनात टर्की, लाव्हा, ससे, वराह याबरोबर कोंबडी आणि शेळ्यांच्या विविध जाती पाहवयास मिळणार आहे. नव्या हायड्रोपोनिक चारापद्धतीचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांचे आकर्षण ठरणार आहे. मुलांसाठी अम्युझमेंट पार्कची उभारणी केली जात असून त्यात लहानग्यांच्या मनोरंजनासाठी विविध खेळणी उभारली जाणार आहेत. (प्रतिनिधी)

सिंधुदुर्गचे हवाई दर्शन
महोत्सवाच्या निमित्ताने १५० लोकांसाठी हेलिकॉप्टरमधून सिंधुदुर्ग दर्शनचा उपक्रम राबविण्यात येत आहे. सुमारे १२ मिनिटांच्या या सवारीतून सिंधुदुर्गचे हवाई दर्शन होईल.
सवारीसाठी साडेचार हजार रूपये शुल्क असून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे संदेश सावंत यांनी सांगितले.
हेलिकॉप्टर सवारी नोंदणीसाठी जिल्हा परिषदेमध्ये अमित तेंडुलकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: The preparations for the Agri festival were organized in the velah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.