आनंददायी गणेशोत्सवासाठी भाविकांची जय्यत तयारी सुरू !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 10:41 AM2019-08-24T10:41:49+5:302019-08-24T10:43:35+5:30
कोकणातील महत्वपूर्ण अशा आनंददायी गणेशोत्सवाचा प्रारंभ होण्यास अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर श्री गणेश मूर्तीशाळांमध्ये बाप्पाच्या मूर्ती बनविण्याच्या कामाने जोर धरला आहे. तर सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील घराघरात स्फूर्तिदायी चैतन्यमय अशा गणेशोत्सवाची विविध प्रकारे जय्यत तयारी सुरु असून संपूर्ण वातावरणच जणू भारावल्यासारखे दिसत आहे.
सुधीर राणे
कणकवली : कोकणातील महत्वपूर्ण अशा आनंददायी गणेशोत्सवाचा प्रारंभ होण्यास अवघे काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर श्री गणेश मूर्तीशाळांमध्ये बाप्पाच्या मूर्ती बनविण्याच्या कामाने जोर धरला आहे. तर सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील घराघरात स्फूर्तिदायी चैतन्यमय अशा गणेशोत्सवाची विविध प्रकारे जय्यत तयारी सुरु असून संपूर्ण वातावरणच जणू भारावल्यासारखे दिसत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी दीड, पाच,सात, नऊ,अकरा, सतरा,एकोणिस, एकविस, बेचाळीस दिवस गणरायाची विधिवत पूजा करून घरोघरी गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी अगोदरच तयारी केली जाते.
श्री गणेशचतुर्थीच्या आधीच साधारणतः महीने दोन महीने मूर्तीच्या बुकिंगला सुरुवात होते. आपल्या घरी गणरायाची सुबक मूर्ती आणता यावी यासाठी नियोजन केले जाते. त्यानुसार मूर्तिकाराना सुचना दिल्या जातात. मूर्तिकारहि भाविकांच्या मागणीनुसार मूर्ती बनवित असतात. सध्या श्री गणेश मूर्तीचे काम जोरदार सुरू आहे.
मोठमोठ्या गणेश मंडळांबरोबरच आता घरगुती गणपतींमध्ये नावीन्यपूर्ण मूर्तीला वाढती मागणी आहे. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वच भागांतून शाडूच्या गणेशमूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
चित्रपट, मालिकांमधील नावाजलेल्या भूमिका, पात्र अशा मूर्ती तयार करून घेण्याचा आग्रह मूर्तिकारांकडे केला जात असून त्याकरिता काही भाविकांनी तर सहा महिने अगोदर मूर्तीचे बुकिंग केले आहे. लालबागचा राजा, दगडूशेठ गणपती , शिर्डीचे साईबाबा अशा विविध अवतारातील मूर्तींना सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गणेश मूर्तीशाळेत पिढ़यान पिढ्या श्री गणेश मूर्ती बनविल्या जात आहेत. तरुण मूर्तिकारांनी आपल्या आजोबांकडून तसेच वडिलांकडून मूर्ती बनविण्याचे धडे घेतलेले दिसून येतात. उच्च शिक्षणानंतरही नोकरी सांभाळून अनेक कुटुंबातील तरुण श्री गणेश मूर्ती साकारताना दिसत आहेत. तर अनेक घरात पिढ्यानपिढ्या मूर्ती बनविल्या जात असल्याने घरातील प्रत्येक व्यक्ती मूर्ती घडविण्याच्या कामात सहभागी झालेली पहायला मिळते. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच या कामात मोठ्या उत्साहाने सहभाग घेत असल्याचे दिसून येते.
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने गेली कित्येक वर्षे सिंधुदुर्गात श्री गणेशमुर्ती शाळेत शाडू मातीपासून मूर्ती तयार केल्या जात आहेत. सण, उत्सव साजरे करताना आजूबाजूच्या पर्यावरणावर त्याचा वाईट परिणाम होणार नाही याची दक्षता घेणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.असे अनेक मूर्तिकारानी सांगितले. तसेच भाविकानीही पर्यावरणपूरक सण साजरे करावेत असे आवाहन काही मूर्तिकार विविध माध्यमातून करीत आहेत.
दिवसेंदिवस महागाईचा आलेख चढत्या क्रमाने वाढत आहे. अनेक वस्तूंच्या किमती वाढल्या वाहेत. तरीही आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी काटकसर करून अनेक भाविक तयारी करीत आहेत.
घरांची साफ़ सफाई करून रंगरंगोटी करण्यात येत आहे. मातीच्या जमीनी शेणाने सारविल्या जात आहेत. गणेशोत्सवाची तयारी सध्या अंतिम टप्प्यात आहे. काही ठिकाणी आरती, भजनाच्या तालमी सुरू झाल्या आहेत.
गणरायाच्या चौरंगाभोवती आरास करण्यासाठी कापड़ी पडद्याचा वापर केला जातो. तसेच घरात कापड़ी छत, झालर बांधण्या बरोबरच घराच्या दरवाजांवर लोकरीचे तोरण लावले जाते. त्यामुळे हे साहित्यही बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. ज्या ठिकाणी श्री गणेश मूर्ती ठेवली जाणार आहे, त्या ठिकाणी भिंतीवर चित्र रेखाटली जात आहेत. तर काही भाविकानी फ्लेक्सचे फलक तयार करून घेतले आहेत. त्यावर निसर्ग चित्रे तसेच विविध महाल अशी चित्रे आहेत.
गणेशोत्सवात विद्युत् रोशणाईलाही अलीकडे महत्व प्राप्त झाले आहे. विजेवर चालणारी तोरणे तसेच विविध रंगांचे दिवे, कारंजे अशा वस्तुंचा सुशोभिकरणासाठी वापर केला जातो. या साहित्याची खरेदी सध्या केली जात आहे. अनेकवेळा असे साहित्य खरेदी करून मुंबईकर मंडळीकडून गावी पाठविले जाते. त्यामुळे श्री गणेश चतुर्थीसाठी मुंबईकर गावी येण्याची वाट अनेक गावातील मंडळी बघत आहेत.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या आदरातिथ्यात काही कमी रहावू नये यादृष्टीनेही प्रयत्न केले जात आहेत. 'अतिथि देवो भव' ही कोकणची संस्कृती असून त्याला अनुसरुन पाहुण्यांचे स्वागत आपल्या घरी व्हावे याबाबत अनेकांकडून नियोजन करण्यात येत आहे.
यावर्षीच्या गणेशोत्सवावर पूरस्थितीचे सावट !
दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य माणसाला सण साजरे करणे तसे कठिणच बनले आहे. मात्र, आपला लाडका गणराया घरी येणार असल्याने गतवर्षी पेक्षा महागाई वाढली असली तरी काटकसर करून का होईना भाविक अनेक वस्तू खरेदी करताना दिसत आहेत. त्याचबरोबर अलीकडे अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. या पुरस्थितीतुन नागरिक आता सावरत असले तरी यावर्षी गणेशोत्सवावर त्या स्थितीचे एकप्रकारचे सावट असल्याचे दिसून येत आहे.