आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रोत्सवाची तयारी पूर्ण, दक्षिण कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ख्याती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 01:07 PM2023-02-02T13:07:12+5:302023-02-02T13:21:22+5:30
रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल, जादा गाड्या सोडण्याची मागणी
मालवण : दक्षिण कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा यात्रोत्सव शनिवारी होत आहे. यावेळी दोन दिवस हा यात्रोत्सव असणार आहे. पहाटे ३ वाजल्यापासून एकूण ९ दर्शन रांगांद्वारे दर्शन घेता येणार आहे. मंदिर परिसरात व प्रशासनाकडून यात्रोत्सवाची तयारी गतिमानरीत्या सुरू आहे.
आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी विकास मंडळ, शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणांकडून जत्रा सुरळीत पार पडण्यासाठी दक्षता घेतली जात आहे. गेली तीन वर्षे कोरोना साथ रोगामुळे जत्रा मर्यादित स्वरूपात साजरी करण्यात आली होती. यावर्षी मात्र निर्बंध मुक्त वातावरणात जत्रा होत असल्याने लाखो भाविकांची पावले आंगणेवाडीत वळणार आहेत.
व्हीआयपी मार्ग अशी ओळख असलेला मसुरे आंगणेवाडी मार्गावरील दत्त घाटीमध्ये प्रथमच पथदीपांची व्यवस्था प्रथमच करण्यात आली आहे. त्यामुळे हा मार्ग अधिक सुरक्षित होणार आहे. देवालयालगत असलेले दोन ट्रान्सफॉर्मर शाळेच्या मागे एकाच ठिकाणी घेण्याच्या कामास प्रारंभ झाला असून यामुळे परिसर अधिक सुरक्षित होणार आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी येथे पोहोचणारे रस्ते दर्जा उन्नती करून प्राधान्याने पूर्ण केल्याने भाविक आभार मानत आहेत. जत्रेच्या दिवशी रात्री व्हीआयपी मार्गावरील मसुरे देऊळवाडा दत्त घाटी येथे होणारी वाहतूककोंडी रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी जादा वाहतूक पोलिस याठिकाणी तैनात करणे आवश्यक आहे.
जादा रेल्वे सोडण्याची मागणी
आंगणेवाडी जत्रोत्सवास मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी कोकणात येतात. या चाकरमान्यांना जिल्ह्यात येण्यासाठी रेल्वेचा प्रवास अधिक सोईस्कर आहे. परंतु ४ फेब्रुवारी पूर्वी सर्व रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. काही गाड्यांचे वेटिंग तिकीट सुद्धा उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जादा गाड्या सोडण्याची मागणी चाकरमान्यांमधून होत आहे. एकूणच जत्रा पूर्व तयारीने बऱ्यापैकी वेग घेतला असून आंगणे ग्रामस्थ लाखो भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज होत असल्याचे चित्र आंगणेवाडीत दिसून येत आहे.