Corona vaccine -सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ मे पासूनच्या लसीकरणासाठीची तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 17:23 IST2021-04-28T17:19:11+5:302021-04-28T17:23:39+5:30
Corona vaccine Sindhudurg : कोरोना या वैश्विक महामारीला आळा घालण्यासाठी सध्या लसीकरणाची मोहीम शासनाने हाती घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही लसीकरण मोठ्या प्रामाणावर सुरू आहे. मात्र जिल्ह्याला आवश्यक असल्यापेक्षा कमी लस मिळत असल्याने. प्रत्येक लाभार्थी व्यक्तीला लस देणे हे जिल्हा आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनालाही अवघड होत आहे.

Corona vaccine -सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ मे पासूनच्या लसीकरणासाठीची तयारी पूर्ण
ओरोस : कोरोना या वैश्विक महामारीला आळा घालण्यासाठी सध्या लसीकरणाची मोहीम शासनाने हाती घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही लसीकरण मोठ्या प्रामाणावर सुरू आहे. मात्र जिल्ह्याला आवश्यक असल्यापेक्षा कमी लस मिळत असल्याने. प्रत्येक लाभार्थी व्यक्तीला लस देणे हे जिल्हा आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनालाही अवघड होत आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ १८०० एवढेच कोव्हॅक्सिनचे डोस शिल्लक असून, जिल्ह्यातील काही ठरावीक ठिकाणी ही लस देणे सुरु आहे. विशेषतः ज्यांचा कोव्हॅक्सिन या लसीचा दुसरा डोस देणे आवश्यक आहे. अशाच ठिकाणी ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोरोना या जागतिक महामारीची दुसरी लाट सध्या सुरू आहे. ही लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक आणि वेगाने पसरत आहे. त्यामुळे एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी लसीचा पर्याय शासनाने उपलब्ध केला आहे. शासनाने हे लसीकरण करण्यासाठी काही टप्पे निश्चित केले आहेत. आतापर्यंत या लसीकरणाचे चार टप्पे पूर्ण झाले असून, आता पाचवा टप्पा सुरू करण्याचे केंद्र शासनाने जाहीर केले आहे.
सध्या ही लस ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना देण्यात येत आहे. यापूर्वी ही लस सर्वांनी घ्यावी यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना जनतेने लस घ्यावी यासाठी विनवणी करावी लागत होती. मात्र, कोरोनाची दुसरी लाट सगळीकडे वेगात वाढू लागल्यावर ही लस घेण्यासाठी नागरिकांची चढ़ाओढ सुरु झाली आहे.
दुसऱ्या डोसच्या ठिकाणी लस ठेवणार
जिल्ह्याला आवश्यक असलेली लस आणि उपलब्ध लस यांचा मेळ बसत नाही. यामुळे सर्वांचे लसीकरण करणे अवघड होऊ लागले आहे. त्यातच आता १ मे पासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठ्या प्रामाणावर लस लागणार आहे.
सद्यस्थितीत ४५ च्या वरील प्रत्येक व्यक्तींला लस देण्यासाठी सुमारे २ लाख डोसची आवश्यकता होती. अशावेळी केवळ २६ हजार एवढीच लस उपलब्ध झाली होती. यापैकी सद्यस्थितीत केवळ १८०० डोस एवढीच कोव्हॅक्सिन ही लस जिल्ह्यात शिल्ल्लक असून ही लस जिल्ह्यातील काही ठरावीक ठिकाणीच ज्या ठिकाणी या लसीचा दुसरा डोस देणे आवश्यक आहे अशा केंद्रांवर ठेवण्यात आली आहे.
६ महिन्यांत लसीकरण पूर्ण व्हावे अशी तयारी : संदेश कांबळे
१ मेपासून १८ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला लस देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. यानुसार जिल्ह्यात आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्याला साधारण ६ ते साडेसहा लाख डोस एवढ्या लसीची आवश्यकता भासणार आहे. महिन्याला साधारण १ लाख व्यक्तिंना लस देता आली तर हे टार्गेट पुढील ६ महिन्यांत पूर्ण होऊ शकणार आहे. मात्र लसीच्या उपलब्धतेवर हे सर्व अवलंबून असल्याचे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी सांगितले.