दर्याला श्रीफळ अर्पण करून मच्छिमार सज्ज
By admin | Published: August 30, 2015 12:25 AM2015-08-30T00:25:52+5:302015-08-30T00:28:58+5:30
सिंधुदुर्गात नारळी पौर्णिमा उत्साहात
मालवण : मालवण, देवगड, वेंगुर्ले किनारपट्टींसह जिल्ह्यात नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. किल्ले सिंधुदुर्गावरून दर्याला मानाचा श्रीफळ अर्पण झाल्यानंतर मालवण बंदरजेटी येथे शहरातील मच्छिमार, व्यापारी आणि नागरिकांनी सागराला श्रीफळ अर्पण केले.
सावंतवाडी येथे ऐतिहासिक मोती तलावात, कुडाळ येथे भंगसाळ नदीत रिक्षा संघटनेने, कणकवली येथे गड नदीत पोलीस ठाण्याच्यावतीने श्रीफळ अर्पण करण्यात आले. मच्छिमार बांधवांनी दर्या राजाची पूजा करीत यावर्षी ‘मस्त्य हंगामात बरकत दे’, असे साकडे घातले.
नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून शनिवारी दुपारी व्यापारी संघाच्यावतीने बाजारपेठेतील हनुमान मंदिरात श्रीफळ ठेवून मालवणच्या भरभराटीसाठी साकडे घालण्यात आले. त्यानंतर व्यापारी संघाचा ‘नारळ’ ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीने हनुमान मंदिर ते बंदर जेटी येथे आणण्यात आला. या मिरवणुकीत मच्छिमार महिला पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर श्रीफळ व कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. सायंकाळी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील रहिवाशांनी सोन्याचा मुलामा लावलेले श्रीफळ समुद्राला अर्पण केले. त्यानंतर मालवण व्यापारी संघाच्यावतीने श्रीफळाची विधिवत पूजा करून व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी सागराला श्रीफळ अर्पण केले. मालवणवासीयांनीही समुद्रात श्रीफळ अर्पण केले.
यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, मालवणचे पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंदार केणी, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख बबन शिंदे, भाई गोवेकर, नंदू गवंडी, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, बाळू अंधारी, नाना पारकर, स्वप्नाली नेरुरकर, लायन्स, लायनेस, रोटरी क्लब सदस्य, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ मालवण, मालवणातील मच्छिमार बांधव, व्यापारी बंधू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मच्छिमारबांधव मासेमारीसाठी सज्ज
मासेमारी ही किनारपट्टीच्या अर्थकारणाचा कणा आहे. नारळी पौर्णिमेपासून नव्या मासेमारी हंगामास सुरुवात करताना, बोटी समुद्रात लोटताना मच्छिमारबांधव दर्यास श्रीफळ अर्पण करून बरकतीची मागणी करतो. शासनाच्या नियमानुसार पूर्वी १० जून ते १५ आॅगस्ट किंवा नारळी पौर्णिमा हा मासेमारी बंदीचा कालावधी असायचा. मात्र, यावर्षी १ जून ते ३१ जुलै हा दोन महिन्यांचा कालावधी मासेमारी बंदीचा होता. त्यामुळे मासेमारी हंगाम १ आॅगस्ट पासून सुरू झाला असला, तरी बहुतांश मच्छिमारबांधव नारळी पौर्णिमेनंतरच नव्या मासेमारी हंगामास सुरुवात करणार आहेत.
कबड्डी स्पर्धेचे आकर्षण
नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून लायन्स व लायनेस क्लब यांच्यावतीने आयोजित महिला व पुरुष गटातील जिल्हास्तरीय कबड्डी सामन्यांचे खास आकर्षण ठरले. वीज वितरण व भाजप यांच्यावतीने नागरिकांना अल्प दारात एलईडी बल्बची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, भाऊ सामंत, विजू केनवडेकर, गणेश कुशे, दादा वाघ, आपा लुडबे व अन्य उपस्थित होते. तसेच शिवसेनेच्यावतीने मालवणवासियांना जिलेबीचे वाटप करण्यात आले.
नारळ लढविण्यासाठी युवकांची गर्दी
आजही नारळी पौर्णिमा उत्सवात बंदरजेटी येथे विविध ठिकाणांहून आणलेले नारळ लढविले जात होते. नारळ लढविण्याबरोबरच नारळी पौर्णिमा उत्सवाचा आनंद युवावर्गासह आबाल वृद्ध, महिला उपस्थित राहून लुटत होते. बंदर जेटीवर त्यामुळे भरगच्च गर्दी अनुभवता आली. मात्र, नारळाच्या किमतीत वाढ झाल्याने नारळी पौर्णिमेपूर्वी महिनाभर आधी नारळाच्या राशी टाकून नारळ लढविण्यात घट झाल्याचे प्रकर्षाने दिसून आले. (प्रतिनिधी)