जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा-बाळा नांदगावकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 08:40 PM2019-02-25T20:40:38+5:302019-02-25T20:41:20+5:30
मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराला आपण सर्वांनी बळ देणे गरजेचे आहे. शासन सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे.
कणकवली: मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराला आपण सर्वांनी बळ देणे गरजेचे आहे. शासन सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे. त्यामुळे मनसैनिकानी जनतेच्या मनात शासन विरोधातील नाराजी पोहचवली पाहिजे. वेळप्रसंगी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी कार्यकर्त्यानी ठेवावी. असे आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले.
वागदे येथील एन.के. मंगल कार्यालयात रविवारी मनसेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी मनसे नेते शिरीष सावंत, प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर , राज्य उपाध्यक्ष सत्यवान दळवी, महिला आघाडी उपाध्यक्षा स्नेहल जाधव, अनिषा माजगावकर , जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, धीरज परब, चैताली भेंडे आदी उपस्थित होते.
बाळा नांदगावकर म्हणाले, राज ठाकरे यांनी सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाची उभारणी केली .जनतेची कामे आताच्या शासनाकडून होत नसल्याने जनतेच्या मनात चीड आहे. अशावेळी मनसेकडे आशेने पाहिले जाते. याचा विचार करा आणि कामाला लागा.
परशुराम उपरकर म्हणाले, राज्य व केंद्र शासनाने जनतेची घोर निराशा केली आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेले युती शासन आता पुन्हा युती करून जनतेसमोर निवडणुकीच्या माध्यमातून येणार आहेत. मात्र, जनता त्याना थारा देणार नाही. जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार, खासदार, पालकमंत्री सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहेत. आतापर्यंत मनसेने त्यांच्यावर वचक ठेवला आहे. परंतु जनतेने मतदानाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्याना त्यांचे अपयश दाखवून द्यावे.
सत्यवान दळवी म्हणाले , महाराष्ट्रात रस्ते टोलमुक्त हवेत. अशी मागणी सर्वात प्रथम राज ठाकरे यांनी केली. मात्र, कोकणात होत असलेल्या महामार्गावर टोल नाके उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे मनसैनिकानी आम्ही टोल भरणार नाही.अशी भूमिका घेऊन रस्त्यावर उतरले पाहिजे. आम्ही काम धंद्यानिमित्त मुंबईत असलो तरी कोकणवासीयांच्या प्रश्नासाठी कायमच तुमच्या सोबत आहोत.असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी उपस्थित अन्य पदाधिकाऱ्यानी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन राजन दाभोलकर यांनी केले.