सावंतवाडी बस स्थानकाच्या इमारतीचा अद्यावत आराखडा तयार करा, मंत्री केसरकरांच्या सूचना
By अनंत खं.जाधव | Published: August 12, 2023 11:59 AM2023-08-12T11:59:43+5:302023-08-12T12:00:43+5:30
पाच वर्षांपूर्वी भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र सध्या एसटी आगाराचे अर्धवट काम झाले
सावंतवाडी : सावंतवाडी आणि वेंगुर्ले एसटी महामंडळाच्या आगाराची इमारत जलदगतीने उभी राहिली पाहिजे त्यासाठी अद्यावत आराखडा तयार करण्यात यावा अशा सक्त सूचना शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान सोमवारी १४ ऑगस्ट रोजी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चैनी हे सावंतवाडी एसटी आगाराला भेट देणार आहेत.
सावंतवाडी एसटी महामंडळाच्या आगाराची इमारत उभी राहिली पाहिजे म्हणून पाच वर्षांपूर्वी भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र सध्या एसटी आगाराचे अर्धवट काम झाले असून या विरोधात सर्वच राजकीय पक्षांकडून आंदोलन छेडण्यात आले होते. त्यानंतर मंत्री केसरकर यांनी स्वतः दखल घेत याबाबत मुंबई येथे ऑनलाईन बैठक घेतली. या बैठकीत सावंतवाडी आणि वेंगुर्ले एसटी बस स्थानकावर पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे.
त्यामुळे जलदगतीने कामे करण्याच्या सुचना मंत्री दिपक केसरकर यांनी दिल्या आहेत. सावंतवाडी आगाराचा अद्यावत आराखडा तयार करण्यात यावा तसेच तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आगाराला भेट द्यावी असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले. त्यामुळे सोमवारी १४ ऑगस्ट रोजी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सावंतवाडीत येणार आहेत.