सिंधुदुर्गात मान्सून पूर्व पावसाची दमदार हजेरी, बळीराजा सुखावला
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: May 30, 2023 04:49 PM2023-05-30T16:49:59+5:302023-05-30T16:50:21+5:30
उकाड्याने ग्रासलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा, वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेमुळे बत्ती गुल
सिंधुदुर्ग : गेले काही दिवस आतुरतेने वाट पाहणाऱ्या सिंधुदुर्गवासियांना मंगळवारी सायंकाळी मान्सून पूर्व सरींनी दिलासा दिला. सायंकाळी ४ नंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाच्या सरी कोसळल्या. सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावल्याने सर्वांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे काही भागातील वीज पुरवठा ठप्प झाला होता.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या अनेक गावांमध्ये दुपारपासूनच दमदार पाऊस कोसळत होता. गेले काही दिवस वातावरणातील बदलामुळे पावसाची चाहूल लागली होती. उष्णतेच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली होती. उष्माघातासारखे वातावरण होते. त्यामुळे नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत होते.
हवामान विभागाने २९ मे पासून सिंधुदुर्गात मान्सून पूर्व सरी कोसळतील असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्याप्रमाणे ३० मे रोजी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. शेतकऱ्यांनी मान्सून पूर्व भातपेरणीला दोन दिवसांपूर्वी सुरूवात केली होती. पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला आहे.