कच्च्या घरांचा आराखडा सादर
By admin | Published: January 23, 2016 12:06 AM2016-01-23T00:06:40+5:302016-01-23T00:50:59+5:30
सुनील रेडकर : जिल्ह्यात २८,३७५ घरे, सहा तालुक्यांची आकडेवारी प्राप्त
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले, देवगड तालुके वगळता उर्वरीत सहा तालुक्यामधून कच्च्या घरांची अंतिम आकडेवारी प्राप्त झाली आहे. त्यानुसार पूर्वीची व आत्ताची मिळून एकून २८ हजार ३७५ कच्च्या घरांच्या दुरूस्तीचा आराखडा अंतिम मंजुरीसाठी आयुक्तांकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प सहाय्यक सुनील रेडकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कच्च्या घरांचा सर्व्हे करा व तसा अहवाल राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवा असे आदेश शासनाकडून सन २०१२ मध्ये प्राप्त झाले होते. त्याची कार्यवाहीही सिंधुदुर्गात करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्याभरातील १९३२५ कच्च्या घरांची यादी तयार करण्यात आली होती. मात्र, गेली दोन वर्ष ही यादी कोकण आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली नव्हती.
कच्च्या घरांची अंतिम यादी निश्चित न झाल्याने ही यादी आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवली गेली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कच्च्या घरांच्या याद्यावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण स्थायी समिती सभेत विस्तृत चर्चादेखिल झाली होती. जिल्हा परिषद अध्यक्ष रणजीत देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत, सदस्य सतिश सावंत यांनी हा विषय गांभीर्याने घेत जिल्ह्यातील कच्च्या घरांची यादी अंतिम करून शासनास सादर करा असे वारंवार सांगण्यात येत होते. मात्र, याबाबत प्रशासन उत्सुक नसल्याचे दिसून येत होेते. ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतची मुदत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मागून देखिल कच्च्या घरांच्या याद्यांचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर न केल्याने नुकत्याच पार पडलेल्या स्थायी समिती सभेत गरमागरम चर्चा झाली. या चर्चेअंती ग्रामीणविकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील रेडकर यांनी १९ जानेवारी रोजी कच्च्या घरांची यादी आयुक्तांकडे सादर करतो असे आश्वासन दिले होते.
याबाबत रेडकर यांना विचारले असता ते म्हणाले, वेंगुर्ले व देवगड तालुका वगळता उर्वरीत सहा तालुक्यांची कच्च्या घरांची यादी प्राप्त झाली आहे. त्यानुसार या सहा तालुक्यांतील २८ हजार ३७५ कच्च्या घरांची यादी अंतिम मंजुरीसाठी आयुक्तांकडे पाठविली आहे. उर्वरीत दोन तालुक्यांची कच्च्या घरांची यादी प्राप्त झाल्यानंतर ती मंजुरीसाठी आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. असे रेडकर म्हणाले. (प्रतिनिधी)
आयुक्त कार्यालयातून : कच्च्या घरांची होणार क्रॉस चेकींग
आयुक्तांकडे पाठविण्यात आलेल्या २८ हजार ३७५ कच्च्या घरांंच्या यादींची फेरतपासणी केली जाणार आहे. खरोखरच जिल्ह्यात एवढी घरे कच्ची आहेत का याची खातरजमा आयुुक्तांक डून केली जाणार असल्याचे सुनील रेडकर यांनी सांगितले. तालुकानिहाय कच्च्या घरांची यादी : वैभववाडी-१८८९, कणकवली-३५९५, मालवण-२६७३, कुडाळ-८७०३, सावंतवाडी-८३७७, दोडामार्ग-३१२० असे एकूण २८३७५ घरे आहेत. यात नव्याने ९०५० तर पुर्वीची १९३२५ असे एकूण २८३७५ घरांचा समावेश आहे.
कच्च्या घरांची संख्या
ज्या घरांना मातीच्या भिंती व कौलारू छप्पर आहे व जी घरे झापाच्या छपरांची आहेत. या घरांचा कच्च्या घरात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या घरांची दुरूस्ती तातडीने होणे आवश्यक आहे. अन्यथा या अतिवृष्टीच्या कालावधीत किंवा वादळी वाऱ्याने यामधील घराची पडझड होण्याची भीती व्यक्त होत आहे.