जिल्हा परिषद अध्यक्षपद महिलांसाठी राखीव
By Admin | Published: November 18, 2016 11:46 PM2016-11-18T23:46:38+5:302016-11-18T23:46:38+5:30
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची दांडी उडाली
सिंधुदुर्गनगरी : राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी शुक्रवारी झालेल्या नव्याने आरक्षण सोडतीत पुढील अडीच वर्षांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपद खुला प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद मतदारसंघ आरक्षणात वाचल्याने अध्यक्षपदासाठी इच्छुक असणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांची यामुळे दांडी उडाली आहे.
विद्यमान पदाधिकाऱ्यांमधून अनेक दिग्गजांची विकेट जिल्हा परिषद मतदार आरक्षण सोडतीने घेतली होती. मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी राहिले होते. मात्र, शुक्रवारच्या निर्णयाने अनपेक्षितपणे जिल्ह्यातील महिलांना पुन्हा एकदा संधी उपलब्ध झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी शुक्रवारी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. यावेळी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, ग्रामविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची सोडत शुक्रवारी, १० जून २०१६ रोजी काढण्यात आली होती. सोलापूर आणि लातूर या दोन्ही जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी लागोपाठ दोनदा अध्यक्षपद आरक्षित झाल्याने सर्वसाधारण प्रवर्गातील सोडतीमध्ये सुधारणा करावी, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते.
त्यानुसार शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षांच्या सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी नव्याने सोडत काढण्यात आली. १० जून रोजी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये सर्वसाधारण ५ प्रवर्गातील सोलापूर आणि लातूर जिल्हा परिषदा लागोपाठ दोनदा महिलांसाठी आरक्षित झाल्या होत्या. त्यामुळे आजची सोडत काढताना मागील वेळी महिलांना आरक्षित असलेले सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि लातूर हे जिल्हे वगळून सर्वसाधारण पदासाठी असलेल्या उर्वरित जिल्ह्यांमधून महिलांसाठी आरक्षण काढण्यात आले. आजच्या सोडतीत ११ जिल्ह्यांमधून ४ जिल्हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी व ७ जिल्हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
‘जिल्हा परिषदेवर अडीच वर्षे महिलाराज’
जूनमध्ये आरक्षण सोडतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आरक्षणपद सर्वसाधारण खुले पडले होते. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी तेव्हापासूनच अध्यक्षपदाच्या शर्यतीत उडी घेतली होती. मात्र, जिल्हा प्रभागनिहाय आरक्षण सोडतीत कित्येक दिग्गजांची विकेट गेल्यामुळे त्यांचा अध्यक्षपदासाठीचा पत्ता कट झाला होता. शुक्रवारी झालेल्या नव्याने आरक्षण सोडतीमध्ये पुढील अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण प्रवर्ग महिलांसाठी जिल्हा परिषद अध्यक्षपद राखीव झाल्याने पुरुष उमेदवारांचे मनसुबे मात्र उधळले आहेत. पुढील अडीच वर्षे जिल्हा परिषद भवनावर ‘महिलाराज’ दिसणार असून इच्छुक महिला उमेदवार निवडणूक लढविण्यासाठी रणांगणात उतरणार आहेत.