काँग्रेसचे सोमवारी राज्यभर रास्ता रोको
By admin | Published: February 6, 2015 11:14 PM2015-02-06T23:14:43+5:302015-02-07T00:09:36+5:30
हरिष रोग्ये : सरकारविरोधी आक्रमक मुद्दे मांडण्याचा नेत्यांचा निर्धार
राजापूर : यापूर्वी विविध प्रकारची आश्वासने देऊन राज्यात सत्तेवर आलेल्या भाजप-सेनेच्या युती शासनाने १०० दिवसांचा कालावधी पूर्ण केला असून, दिलेल्या आश्वासनांची कुठलीच पूर्तता केलेली नाही. भांडवलदारांसाठी योजना राबवणाऱ्या या शासनाने जनतेला वाऱ्यावर सोडले असून, त्यांच्या अपयशी कामकाजाविरुद्ध काँग्रेसने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. येत्या ९ फेब्रुवारीला संपूर्ण राज्यभर रास्ता राको आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हरिष रोग्ये यांनी राजापुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.केंद्र व राज्यातील भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरले आहे. खोटी आश्वासने देऊन सत्ता प्राप्त करणाऱ्या भाजपने जनतेच्या हिताचे निर्णय घेतलेले नाहीत. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना हे शासन दिसत नाही. या सरकारला भाववाढदेखील रोखता आलेली नाही, असा आरोप रोग्ये यांनी केला.सरकारमध्ये सहभागी असलेल्या दोन पक्षात एकवाक्यता नाही. भाजपचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांचे नाराजी नाट्य कायम आहे. एलबीटी, टोलबाबत योग्य भूमिका घेऊ, असे सांगणाऱ्या आजच्या सत्ताधाऱ्यांनी ते रद्द करण्यासाठी काहीच केलेले नाही, तर केंद्रातील सरकारची अवस्थाही याहून वेगळी नसल्याचे रोग्ये म्हणाले.केवळ मोदी हेच सर्वेसर्वा आहेत. अमेरिकेसोबत कोणते करार झाले, त्याचा लेखाजोखा अद्याप जनतेपुढे आलेला नाही. देशाच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यादेखील परराष्ट्र धोरण ठरवताना कुठेच दिसत नाहीत. फक्त आश्वासने देऊन भाजप सत्तेवर आला आहे.भांडवलदारांचे लांगुलचालन करणे हाच या सरकारचा एककलमी कार्यक्रम आहे. त्यांना सर्वसामान्य जनतेचे काहीच देणेघेणे लागत नाही. त्यामुळे या सरकारचा खरा चेहरा जनतेला कळावा, यासाठी काँग्रेसने आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ९ फेब्रुवारीला संपूर्ण राज्यात रास्ता रोको करुन सरकारचे लक्ष वेधणार असल्याचा इशारा प्रदेश प्रवक्ते रोग्ये यांनी दिला. (प्रतिनिधी)